Sunday, October 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक संधिवात दिन: सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि निरोगी जीवनशैलीमुळे सांध्यांचे आरोग्य राखण्यास...

जागतिक संधिवात दिन: सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि निरोगी जीवनशैलीमुळे सांध्यांचे आरोग्य राखण्यास मदत

 

पुणे, ११ ऑक्टोबर २०२६: संधिवाताचा त्रास आता पूर्वीच्या तुलनेत कमी वयातील व्यक्तींमध्येही आढळत आहे. बैठी जीवनशैली, वाढते वजन, अपुरा व्यायाम आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे सांध्यांवरील ताण वाढत असून, सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखणे आणि योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे, असे लोकमान्य हॉस्पिटल्सचे संस्थापक आणि ऑर्थोपेडिक व सांधे रोपण शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र वैद्य यांनी जागतिक संधिवात दिनानिमित्त सांगितले.

 

संधिवात हा सांध्यांवर परिणाम करणारा आजार असून त्यामध्ये वेदना, सांध्यांमध्ये कडकपणा आणि हालचालींवर मर्यादा येऊ शकतात. निरोगी सांध्यांमध्ये हाडांच्या टोकांवर गुळगुळीत उपास्थीचा/ कुर्च्याचा ( कार्टिलेज ) थर असतो. त्यामुळे हाडांची एकमेकांवरील हालचाल अत्यंत कमी घर्षणासह सहजपणे होते. मात्र, हे कार्टिलेज खराब झाले किंवा झिजले, तर हाडे एकमेकांवर घासू लागतात. त्यामुळे वेदना, सूज आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो.

 

संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी ऑस्टिओआर्थरायटिस आणि इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस हे तुलनेने सामान्य प्रकार आहेत. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये कालांतराने कुर्च्याची झीज होत जाते. मात्र, बदलती जीवनशैली, बैठी जीवनपद्धती, वाढते वजन, अपुरा व्यायाम आणि अयोग्य आहारपद्धती यांमुळे हा त्रास आता कमी वयातही होण्याचे प्रमाण वाढत आहे.

 

दुसरीकडे, इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसमध्ये रुमेटॉइड आर्थरायटिससारख्या स्वयंप्रतिकार विकारांचा समावेश होतो. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा स्वतःच्या शरीरातील ऊतींवर हल्ला करते. ही स्थिती तुलनेने कमी वयात, अगदी किशोरवयीन व्यक्तींमध्येही निर्माण होऊ शकते आणि योग्य उपचार न मिळाल्यास त्याची प्रगती वेगाने होऊन सांध्यांचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

डॉ. वैद्य यांनी सांगितले की, शरीरात होणारी प्रत्येक वेदना किंवा स्नायूंचा थकवा म्हणजे संधिवात असे समजणे योग्य नाही. सांध्यांशी संबंधित समस्यांमध्ये सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे, गुडघा पूर्णपणे वाकवताना वेदना होणे तसेच सांध्यांची अधिक लवचिकता आवश्यक असलेल्या हालचाली करताना त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. मांडी घालून बसताना किंवा खाली वाकून बसताना होणारी वेदनाही गुडघ्याच्या सांध्यातील समस्येचा सुरुवातीचा इशारा असू शकतो.

 

“ही सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. सुरुवातीच्या टप्प्यात कार्टिलेजला नुकसान झालेले असते, मात्र ते पूर्णपणे झिजलेले नसते. अशावेळी योग्य उपचारांमुळे लक्षणे नियंत्रित करण्याबरोबरच सांध्यांची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते,” असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

 

संधिवाताचा प्रकार आणि त्याची तीव्रता यानुसार उपचारपद्धती ठरवली जाते. यामध्ये व्यायाम, वजन नियंत्रण, फिजिओथेरपी आणि औषधोपचारांचा समावेश असू शकतो. काही निवडक रुग्णांमध्ये आणि आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात हायलुरॉनिक अॅसिड इंजेक्शन किंवा प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (पीआरपी ) इंजेक्शन यांसारख्या उपचारांचाही विचार केला जाऊ शकतो. मात्र, या उपचारांची उपयुक्तता आणि परिणामकारकता प्रत्येक रुग्णानुसार वेगळी असते. तसेच, पूर्णपणे नष्ट झालेले कार्टिलेज हे उपचार पुन्हा निर्माण करू शकत नाहीत.

 

आजाराच्या प्रगत अवस्थेत, विशेषतः कार्टिलेजचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यास, शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. सांधेबदल शस्त्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे, नुकसान सांध्याच्या केवळ एका भागापुरते मर्यादित असल्यास योग्य रुग्णांमध्ये पार्शल नी रिप्लेसमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. काही निवडक रुग्णांमध्ये मध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शस्त्रक्रियेतील अचूकता आणि रोपणाचे योग्य स्थान निश्चित करण्यास मदत होते.

 

सांध्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी चार महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य वजन राखणे आणि शरीराची योग्य ठेवण (पोश्चर) राखणे. या सवयींमुळे सांध्यांवर येणारा अनावश्यक ताण कमी करण्यास तसेच वय वाढल्यानंतरही हालचाल सुलभ ठेवण्यास मदत होते.

 

अनुवंशिकता हा देखील, विशेषतः इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसमध्ये, एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते. मात्र, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे जोखीम वाढविणाऱ्या घटकांचे व्यवस्थापन करता येते आणि सांध्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते.

 

“दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून वेदना जाणवू लागण्याची वाट न पाहता सांध्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः कुटुंबात संधिवाताचा इतिहास असल्यास वयाच्या ३५–४० वर्षांनंतर हाडे आणि सांध्यांच्या आरोग्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे. सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखणे, योग्य उपचार घेणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे यामुळे दीर्घकाळ हालचालक्षमता आणि जीवनमान चांगले राखण्यात मोठा फरक पडू शकतो,” असे डॉ. वैद्य यांनी

सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments