पुणे, दि.१२: मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ मधील तरतुदीनुसार श्री. एकवीरा देवी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये याकरता जड अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
वाहतूक बदलानुसार कार्ला फाटा ते श्री. एकवीरा देवी पायथा मंदिर दरम्यान २० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण वेळ अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषेध करण्यात आला आहे. तसेच १५ ते १९ ऑक्टोबर या दिवसात सकाळी ६ ते रात्री १० च्या दरम्यान जुना मुंबई -पुणे व पुणे-मुंबई हायवे रोडवर कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा, वडगाव मावळ या मार्गावर अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषेध करण्यात आला आहे. या वाहनचालकांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाका मार्गे पर्यायी मार्ग वापरावा.
पुणे ते मुंबई जुन्या मुंबई पुणे हायवे वरून पुणे बाजूकडे जाणारी जड- अवजड व मोठे वाहने यांना लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उरसे टोलनाका मार्गे पुणे शहराकडे जाता येईल. तसेच पुणे मुंबई कडे जाणारी जड अवजड व मोठी वाहने वडगाव येथील तळेगाव फाटा येथून उर्से खिंडीतून मुंबईकडे जाण्यासाठी द्रुतगती महामार्गाने वळविण्यात आले आहेत.
या कालावधीत मौजे कार्ला फाटा येथून श्री एकवीरा देवी मंदिराकडे जाणारी अवजड व मोठ्या वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी कार्ला फाटा येथे हाईट बॅरिकेटिंग करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
००००


