पुणे, दि. २ नोव्हेंबर
(प्रतिनिधी)
दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या घराची स्वच्छता करतो,मग आपल्या ऐतिहासिक वारसास्थळांची स्वच्छता आणि जतन करण्याची जबाबदारीही आपलीच आहे,या भावनेतून पाञ्चजन्य फाउंडेशनतर्फे आज पूना हॉस्पिटलसमोरील नदीपात्रात असलेल्या श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत समाधी परिसरातील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऐतिहासिक वारसास्थळांचे पावित्र्य,स्वच्छता आणि सौंदर्य जपण्यासोबतच नागरिकांमध्ये ऐतिहासिक वारशाप्रती जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
पुणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या Adar Poonawalla Clean City Initiative यांनी देखील या स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी बजावली.
श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी हे पुण्याच्या ऐतिहासिक वारशातील एक महत्त्वाचे स्थळ आहे.अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही केवळ शासनाची किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून,प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे.नागरिकांनी पुढाकार घेऊन अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी योगदान द्यावे,असे आवाहन पाञ्चजन्य फाउंडेशनतर्फे करण्यात आले.
स्वच्छतेसाठी एकत्रित आलेल्या पर्यावरणप्रेमींना नानासाहेब पेशव्यांच्या कर्तृत्वाची ओळख इतिहास अभ्यासक व फाउंडेशनचे सचिव रश्मिन कुलकर्णी यांनी करवून दिली. “आपली घरे स्वच्छ ठेवताना आपल्या इतिहासाचा वारसा जपणारी स्थळेही स्वच्छ ठेवूया”हा संदेश फाउंडेशनचे अध्यक्ष समीर कुलकर्णी यांनी दिला.


