Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिमुकल्यांनी साकारले ऐतिहासिक किल्ले* - रायसोनी स्कूलमध्ये शिवकालीन वारशाचा जागर! -किल्ला...

चिमुकल्यांनी साकारले ऐतिहासिक किल्ले* – रायसोनी स्कूलमध्ये शिवकालीन वारशाचा जागर! -किल्ला बनवा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

पुणे : दिवाळीच्या पारंपरिक उत्साहाला ऐतिहासिक वारशाची जोड देत वाघोलीतील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आंतरगट किल्ला बनवा स्पर्धा नुकतीच पार पडली. माती, दगड, गवत, काड्या आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या किल्ल्यांनी शाळेच्या परिसरात जणू शिवकालीन इतिहासाचा देखावा उभा केला. रायगड, सिंहगड, प्रतापगड आणि शिवनेरी यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी मेहनतीने तयार केल्या. बुरूज, प्रवेशद्वारे, खंदक, भगवे ध्वज तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या प्रतिकृतींमुळे या किल्ल्यांना विशेष आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांनी केवळ किल्ल्यांची रचना केली नाही, तर त्यामागील ऐतिहासिक वारसाही अभ्यासातून जाणून घेतला.

स्पर्धेचे परीक्षण सर्जनशीलता, ऐतिहासिक अचूकता, नीटनेटकेपणा, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर आणि सांघिक कार्य या निकषांवर करण्यात आले. स्पर्धेत मुरुड-जंजिरा समूहाने प्रथम, तर शिवराय रायगड समूहाने द्वितीय क्रमांक पटकावला. अथर्व भुरे आणि अवनी भुरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

किल्ले म्हणजे केवळ दगड-माती नव्हे, तर आपल्या शौर्याची आणि स्वाभिमानाची गाथा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी किल्ले साकारल्याने त्यांना इतिहासाची ओळख अधिक प्रभावीपणे होते, असे मत प्राचार्य अजय लांडगे यांनी व्यक्त केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच सांघिक भावना, संयम, सर्जनशीलता आणि ऐतिहासिक वारशाविषयी आदराची भावना रुजविण्यात आली. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments