Thursday, November 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedटॉप 10 च्या स्पर्धेमधील गर्मी वाढत असताना स्पर्धकांच्या त्यांच्या पालकांसोबतच्या विशेष सादरीकरणांसह...

टॉप 10 च्या स्पर्धेमधील गर्मी वाढत असताना स्पर्धकांच्या त्यांच्या पालकांसोबतच्या विशेष सादरीकरणांसह ‘सा रे ग म प 2026’ साजरा करत आहे बालदिन!

झी टीव्हीचा ‘सा रे ग म प 2026’ हा लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ ही आपली ओळख कायम राखत भारतीय संगीताची समृद्ध परंपरा साजरी करत आहे आणि देशभरातील गुणी गायकांना आपली कला सादर करण्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. यंदाच्या आठवड्यात या कार्यक्रमात दोन खास पर्वांचा संगम पाहायला मिळणार आहे. एकीकडे स्पर्धक आणि त्यांच्या पालकांच्या एकत्रित सादरीकरणांनी सजलेला बालदिन विशेष भाग रंगणार आहे, तर दुसरीकडे बहुप्रतीक्षित ‘टॉप 10 – सुरों की जंग’ या स्पर्धेचीही दमदार सुरुवात होणार आहे.

 

 

 

बालदिनाच्या विशेष भागाची सुरुवात करताना मीर पहिल्यांदाच आपल्या वडिलांसोबत मंचावर येऊन ‘केसरिया बालम’ हे गीत सादर करणार आहे. त्यांच्या कुटुंबातील सात पिढ्यांचा संगीतवारसा आणि पिढ्यान् पिढ्या जपली गेलेली संगीत परंपरा या सादरीकरणातून अनुभवायला मिळणार आहे. ह्या सेलिब्रेशनमधील आणखी एक खास आकर्षण ठरणार आहे शिवानी हिचे सादरीकरण. ती आपल्या वडिलांसोबत ‘काहे छेडे’ हे गाणे सादर करणार असून तिच्या या परफॉर्मन्सने परीक्षक जावेद अली भारावून गेले. चित्रीकरणादरम्यान या सादरीकरणाने प्रभावित होत त्यांनी, “ये क्या देख लिया, गूजबम्प्स आ गये मुझे तो!” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. याशिवाय, शिवानीचे वडील आणि शंकर महादेवन यांच्यात रंगणारी खास संगीतमय जुगलबंदी या सादरीकरणाला आणखी अविस्मरणीय बनवणार आहे. संगीतावरील समान प्रेमातून साकारलेला हा सुरेल संगम प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे.

 

 

 

बालदिनाचा हा सोहळा आणखी भावुक होईल, जेव्हा गीत आपल्या वडिलांसोबत ‘कैसे पहेली जिंदगी’ हे गाणे सादर करेल. यावेळी तिचे वडील आपल्या भावना व्यक्त करताना सांगतील की, गीतच्या संगीतप्रवासामुळेच त्यांना आज या मंचावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा क्षण त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत खास आणि भावनिक ठरणार आहे. याशिवाय कुमार सानू हे मिन्हा फातिमा आणि तिच्या वडिलांसोबत ‘आज मैं ऊपर’ या गीताचे खास सादरीकरण करत ‘सा रे ग म प’च्या मंचावर आणखी संस्मरणीय संगीतमय क्षण निर्माण करणार आहेत.

 

 

 

बालदिनाच्या या विशेष सोहळ्यासोबतच स्पर्धाही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. ‘टॉप 10 – सुरों की जंग’ या फेरीला सुरुवात होत असल्याने स्पर्धकांच्या संगीतप्रवासातील आव्हाने आणखी कठीण होणार आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना अनेक रोमांचक संगीत आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. याचाच भाग म्हणून सूत्रसंचालक श्रेयस तळपदे ‘सुरों का रिंग’ या संकल्पनेवर आधारित खास कव्वाली चॅलेंज सादर करणार असून, त्यातून फेस-ऑफ स्पेशल फेरीची रंगत वाढणार आहे. अतुल आणि मीर हे ‘छाप तिलक’ या गाण्यावर आमनेसामने येणार आहेत, तर श्रद्धा आणि शिवानी ‘घर मोरे परदेसिया’ या गीतावर सुरांची जुगलबंदी रंगवणार आहेत. यानंतर अयान आणि सेहजदीप ‘वो शाम कुछ अजीब थी’ या गाण्यावर एकमेकांना टक्कर देताना दिसणार असून, प्रत्येक स्पर्धक आपली वेगळी छाप पाडण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा सरस ठरण्यासाठी सर्वोत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

 

 

या सर्व रोमांचक क्षणांव्यतिरिक्त, ‘सा रे ग म प’ संगीताची जादू आता छोट्या पडद्याच्या पलीकडेही घेऊन जाणार आहे. एका अनोख्या तंत्रज्ञानाधारित उपक्रमाच्या माध्यमातून ‘घर का संगीतस्थान’ हा इंटरॲक्टिव्ह गेमिंग अनुभव प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आला असून, यामुळे कार्यक्रम पाहताना प्रेक्षकांनाही त्यात सहभागी होता येणार आहे आणि खेळाचा आनंद लुटता येणार आहे.

 

 

 

‘सा रे ग म प’ पाहताना प्रेक्षकांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. हा क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन केल्यानंतर ते थेट ‘घर का संगीतस्थान’ या गेममध्ये सहभागी होऊ शकतील. या गेममध्ये संगीताशी संबंधित रंजक माहितींसह अनेक मजेदार आणि सोप्या बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक योग्य उत्तरासाठी गुण मिळतील, ज्यामुळे खेळाडूंना लीडरबोर्डवर आपले स्थान उंचावता येईल आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळेल. घरबसल्या संपूर्ण कुटुंबासोबत कार्यक्रमाशी जोडले जाणे, संगीताविषयीचे ज्ञान आजमावणे, रंजक गोष्टी जाणून घेणे आणि ‘सा रे ग म प’च्या या अनोख्या अनुभवाचा भाग बनणे यासाठी हा एक रोमांचक आणि मनोरंजक उपक्रम ठरणार आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments