* पुण्यातील चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. काळे डायबेटिस अँड सायकिॲट्री क्लिनिक यांचा संयुक्त अभ्यास
पुणे,१३ नोव्हेंबर २०२६ : सुरुवातीच्या टप्प्यातील टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी पारंपरिक भारतीय आहारपद्धती आणि नियमित शारीरिक व्यायाम यांचा प्रभावी उपयोग होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. पुण्यातील चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.काळे डायबेटिस अँड सायकिॲट्री क्लिनिक यांनी संयुक्तपणे केलेल्या या अभ्यासात सहा महिन्यांच्या आहार व जीवनशैलीविषयक हस्तक्षेपानंतर सुरुवातीच्या टप्प्यातील टाइप २ मधुमेह असलेल्या ६०.९ टक्के प्रौढांमध्ये मधुमेहाची रेमिशन अवस्था (विशिष्ट काळासाठी औषधातून मुक्तता) साध्य झाल्याचे दिसून आले.
हा अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील डायबेटिस अँड मेटाबॉलिक सिंड्रोम : क्लिनिकल रिसर्च अँड रिव्ह्यूज (एल्सेव्हियर, २०२६) या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीपासून टाइप २ मधुमेह असलेल्या ८७ प्रौढांचा समावेश करण्यात आला होता.
अभ्यासात सहभागी व्यक्तींना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या आणि आरोग्यदायी अशा मध्यम कर्बोदकयुक्त आहारपद्धतीचा (लोकल हेल्दी मॉडरेट कार्बोहायड्रेट – एलएचएमसी) अवलंब करण्यास सांगण्यात आले. यामध्ये बहुधान्यांच्या पोळ्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि फळे यांसारख्या नेहमीच्या भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश होता. प्रत्येक पदार्थाचे प्रमाण निश्चित करून आहारातील कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांचे संतुलन राखण्यात आले होते. यासोबतच दररोज ४० मिनिटे चालणे आणि १० मिनिटे दीर्घ श्वसनाचे व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
सहा महिन्यांनंतर ८७ पैकी ५३ सहभागी (६०.९ टक्के) कोणत्याही रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या औषधांशिवाय मधुमेहाच्या रेमिशन अवस्थेत पोहोचल्याचे आढळले. सहभागींच्या वजनात सरासरी ४.६७ किलो घट झाली, तर सरासरी एचबीए१सी पातळी ७.३२ टक्क्यांवरून ६.२७ टक्क्यांपर्यंत खाली आली. यावरून रक्तातील साखरेच्या नियंत्रणात सुधारणा झाल्याचे दिसून आले.
या अभ्यासातील आणखी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण म्हणजे नियमित शारीरिक हालचाली आणि मधुमेहाच्या रेमिशनमधील संबंध. निर्धारित वेळापत्रकानुसार किमान ८० टक्के दिवस चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत रेमिशन अवस्था प्राप्त होण्याची समायोजित शक्यता ८.२४ पट अधिक असल्याचे आढळले.
सुरुवातीच्या टप्प्यातील टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी व्यावहारिक, परवडणाऱ्या आणि भारतीय खाद्य संस्कृतीशी सुसंगत आहार व जीवनशैलीतील बदल उपयुक्त ठरू शकतात, हे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.
चेलाराम हॉस्पिटल डायबेटिस केअर अँड मल्टिस्पेशालिटीच्या क्लिनिकल सर्व्हिसेस विभागप्रमुख डॉ. वेदवती पुरंदरे म्हणाल्या, “या अभ्यासात सहभागी झालेल्या रुग्णांना कोणतेही विशेष खाद्यपदार्थ खाण्याची, जेवण टाळण्याची किंवा ठरावीक वेळ उपाशी राहण्याची गरज भासली नाही. त्यांनी आपल्या कुटुंबात नेहमी तयार होणारा पारंपरिक भारतीय आहारच योग्य प्रमाणात घेतला आणि दररोज चालण्याचा व्यायाम केला. दहापैकी सहा रुग्णांमध्ये मधुमेहाच्या रेमिशनची अवस्था साध्य झाली. नियमितपणे चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये याचे परिणाम अधिक चांगले दिसून आले.”
चेलाराम हॉस्पिटल डायबेटिस केअर अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन म्हणाले, “मधुमेह हा एकदा झाला की तो केवळ वाढतच जातो, अशी धारणा दीर्घकाळापासून आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास योग्य भारतीय आहार आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने मधुमेह रेमिशन अवस्थेत आणणे शक्य असल्याचे हा अभ्यास दर्शवतो. प्रत्येक रुग्णाला अतिशय बंधनकारक आहारपद्धती देण्याची आवश्यकता नसते. रुग्णाच्या गरजेनुसार उपचार आणि आहाराचे नियोजन करता येते. तथापि, या निष्कर्षांची खात्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियंत्रित अभ्यास करणे आवश्यक आहे. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपली औषधे बंद करू नयेत किंवा उपचारपद्धतीत बदल करू नयेत.”
या अभ्यासातील संशोधक डॉ. मयुरा काळे म्हणाल्या, “हा अभ्यास दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये केल्यामुळे एकाच क्लिनिकपुरते निष्कर्ष मर्यादित न राहता विविध पार्श्वभूमीच्या व्यक्तींमध्ये या आहार पद्धतीचा परिणाम तपासता आला. सहभागी व्यक्तींनी पोळ्या, डाळ, मोड आलेली कडधान्ये आणि भाज्या यांसारखे नेहमीचे घरगुती पदार्थच योग्य प्रमाणात खाल्ले. आहाराच्या नोंदी, जेवणाचे छायाचित्र आणि नियमित दूरध्वनी संपर्काच्या माध्यमातून त्यांच्या आहाराचे निरीक्षण करण्यात आले. सहा महिने ही पद्धत सातत्याने पाळणे शक्य असल्याचे दिसून आले. दररोज व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये रेमिशन अवस्था साध्य होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे विशेषत्वाने आढळले. मधुमेह असलेल्या कोणत्याही शहरातील व्यक्तींसाठी हा एक महत्त्वाचा आणि प्रत्यक्षात अंमलात आणता येण्यासारखा संदेश आहे.”
चेलाराम डायबेटिस रिसर्च सेंटरच्या प्रमुख संशोधन सदस्य डॉ.शाल्भा तिवारी, म्हणाल्या, “संशोधक म्हणून या जीवनशैलीतील बदलांमुळे शरीरात नेमके कोणते बदल होतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासात इन्सुलिन प्रतिरोधकतेत घट झाली, ट्रायग्लिसराइड्स आणि यकृताशी संबंधित एन्झाइम्सची पातळी कमी झाली. तसेच, सातत्यपूर्ण ग्लुकोज निरीक्षणातून (सीजीएम) मधुमेहाची औषधे न घेता रक्तातील साखर अधिक काळ सामान्य मर्यादेत राहिल्याचे दिसून आले. यावरून शरीराची स्वतःची रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता सुधारत असल्याचे संकेत मिळतात. अभ्यासात सहभागी झालेल्या आणि नंतर अभ्यासातून बाहेर पडलेल्या व्यक्तींचाही विश्लेषणात समावेश करण्यात आला. तरीही ५३ टक्के नव्हे, तर एकूण सहभागींपैकी ५३ व्यक्तींमध्ये म्हणजेच ६०.९ टक्के रेमिशन आढळले. हा एकाच गटावर केलेला अभ्यास असल्याने पुढील टप्प्यात यादृच्छिक नियंत्रित चाचणी (रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल) आवश्यक आहे. धान्ये, कडधान्ये, भाज्या आणि सुका मेवा यांचा समावेश असलेला प्रामुख्याने वनस्पतीजन्य आहार माणसांच्या आरोग्यासोबतच पर्यावरणासाठीही उपयुक्त ठरू शकतो. अशा संशोधनाला चेलाराम फाउंडेशनचा पाठिंबा आहे.”
अभ्यासाची ठळक वैशिष्ट्ये
* पुण्यातील चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. काळे यांच्या क्लिनिकमधील दोन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीपासून टाइप २ मधुमेह असलेल्या ८७ प्रौढांचा अभ्यासात समावेश.
* वैद्यकीय देखरेखीखाली पहिल्या दिवसापासून मधुमेहाची औषधे बंद करण्यात आली.
* दररोज सुमारे १२०० किलोकॅलरी ऊर्जेचा घरगुती आहार. यामध्ये बहुधान्यांच्या पोळ्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये, भाज्या, सुका मेवा आणि फळांचा समावेश.
* आहारातील ऊर्जेचे प्रमाण : कर्बोदके ४४ ते ४६ टक्के, प्रथिने २५ ते ३० टक्के आणि स्निग्ध पदार्थ २५ ते ३० टक्के.
* दररोज ४० मिनिटे चालणे आणि १० मिनिटे दीर्घ श्वसनाचे व्यायाम.
* अभ्यासाच्या सुरुवातीला आणि शेवटी सातत्यपूर्ण ग्लुकोज निरीक्षण प्रणालीद्वारे (सीजीएम) रक्तातील साखरेचे परीक्षण.
सहा महिन्यांनंतरचे निष्कर्ष
निकष
निष्कर्ष
मधुमेहाची रेमिशन अवस्था (औषधांशिवाय)
८७ पैकी ५३ व्यक्ती (६०.९ टक्के); अभ्यास पूर्ण केलेल्यांमध्ये ६१.३ टक्के
वजनातील घट
सरासरी ४.७ किलो
एचबीए१सी पातळी
७.३२ टक्क्यांवरून ६.२७ टक्क्यांपर्यंत घट
किमान ८० टक्के दिवस चालण्याचा व्यायाम
रेमिशन अवस्था प्राप्त होण्याची शक्यता ८.२४ पट अधिक
सीजीएमनुसार सामान्य रक्तशर्करा मर्यादेतील कालावधी
रेमिशन झालेल्यांमध्ये ९०.७ टक्के; रेमिशन न झालेल्यांमध्ये ८५.५ टक्के
अतिरिक्त औषधांची आवश्यकता
८७ पैकी ३ व्यक्तींना; कोणतीही गंभीर प्रतिकूल घटना नोंदवली नाही
सूचना : या अभ्यासात नियंत्रण गट नव्हता आणि अभ्यासाचा कालावधी सहा महिन्यांचा होता. त्यामुळे या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी यादृच्छिक नियंत्रित चाचणी आवश्यक आहे. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मधुमेहाची औषधे बंद करू नयेत.
चेलाराम वुमेन्स हेल्थ सेंटरमध्ये प्रौढांसाठी लसीकरण केंद्र सुरू
प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चेलाराम हॉस्पिटलच्या चेलाराम वुमेन्स हेल्थ सेंटरमध्ये प्रौढांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती चेलाराम वुमेन्स हेल्थ सेंटरच्या प्रमुख डॉ. मंजुषा घुमरे यांनी दिली.
प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिकांना गंभीर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळावे, संसर्गामुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंती आणि रुग्णालयात दाखल होण्याची वेळ कमी यावी, तसेच निरोगी वृद्धत्वाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींना संसर्गामुळे गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांच्यासाठी लसीकरणाला विशेष महत्त्व आहे.
Photo Caption : From left Gayatri Kulkarni, Registered


