पुणे : भाऊबीज हा बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते जपणारा सण. याच सणाचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत कसबा भागाच्या वतीने बुधवार पेठेतील देवदासी भगिनी आणि वेश्याव्यवसायात कार्यरत महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. या वेळी महिलांना धान्य, मिठाई आणि साडीचोळी यांसह १२ जीवनावश्यक वस्तूंचा संच भेट देण्यात आला. तसेच दुष्काळग्रस्त भागातील महिलांनाही धान्य किटचे वाटप करून दिवाळीचा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला.
बुधवार पेठेतील नामदेव शिंपी कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमाला मुंबई क्षेत्राचे क्षेत्रीय धार्मिक प्रमुख संजय मुदराळे, किशोर चव्हाण, शैलेश जाधव, नामदेव शिंपी कार्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब लखामदे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय मुदराळे म्हणाले, गरजू व्यक्तींना मदत करणे हे आमचे सामाजिक कर्तव्य आहे. दिवाळीत लावलेली पणती कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान प्रकाश देते. याच भावनेतून विश्व हिंदू परिषद समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून विविध सेवा उपक्रम राबवत आहे. देवदासी भगिनींच्या आयुष्यात अनेक सामाजिक आणि आर्थिक आव्हाने आहेत. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना दररोज संघर्ष करावा लागतो. त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवून त्यांना सन्मान, आपुलकी आणि आधार देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील महिलांसोबतही भाऊबीज साजरी करण्यात आली. इंद्र फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि शेवगाव या भागांतील महिलांना एकूण १,००० धान्य किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये रवा, मैदा, साखर, बेसन यांसह १२ जीवनावश्यक वस्तू आणि दिवाळीचा फराळ देण्यात आला.
किशोर चव्हाण म्हणाले, दिवाळीचा आनंद आपल्या घरापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांना आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. महिलांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक आधार आणि पाठबळ देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विश्व हिंदू परिषद या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.


