Friday, November 13, 2026
Google search engine
HomeUncategorized*जनजातीय गौरव दिवस विशेष लेख* ...

*जनजातीय गौरव दिवस विशेष लेख* *आदिवासी आणि पर्यावरण; निसर्गाचे खरे रक्षक जैवविविधतेचे संवर्धक आणि शाश्वत विकासाची मार्गदर्शक*

 

 

 

मानव आणि निसर्ग यांचे नाते अतिशय प्राचीन आहे. परंतु निसर्गाशी समन्वय साधून, त्याचे महत्व ओळखून आणि त्याचे संरक्षण करुन जीवन जगण्याची परंपरा आदिवासी समाजाने पिढ्यानपिढ्या जपली आहे. आदिवासी समाजासाठी जंगल हे केवळ लाकूड, फळे, किंवा उपजीविकेचे साधन नसून ते त्यांच्या संस्कृतीचे, श्रद्धेचे, अर्थव्यवस्थेचे आणि अस्तित्वाचे केंद्र आहे. म्हणूनच आदिवासी समाजाला जल जंगल व जमीन यांचा पारंपारिक रक्षम मानले जाते.

 

महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नंदुरबार, पालघर, नाशिक, ठाणे, पुणे, रायगड, यवतमाळ आणि अमरावती या जिल्हयांमध्ये विविध आदिवासी जमाती आजही निसर्गाशी जवळीक साधनू जीवन जगत आहेत. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील गोंड, माडिया, कोलाम आणि इतर आदिवासी समुदायांचे जंगलाशी असलेले नाते अत्यंत महत्वपूर्ण आहे.

 

*जंगल सवंर्धनातील आदिवासींची भूमिका*

 

आदिवासी समाजाने जंगलाचा वापर करताना निसर्गाचे संतुलन राखण्याची परंपरा जपली आहे. जंगलातील फळे, फुले, कंदमुळे, औषधी वनस्पती, बांबू, तेंदूपाने, मोहफुले, हिरडा, बेहडा, आवळा, मध आणि डिंक यांसारख्या गौण वनोपजांचा वापर त्यांच्या दैनंदिन जीवनात केला जातो.

मात्र, या संसाधनांचा वापर करताना स्थानिक ज्ञान, ऋतुमान आणि उपलब्धतेचा विचार केला जातो, बियाणे आणि रोपे टिकून राहतील अशा पध्दतीने फळे गोळा करणे, मध संकलन करताना मधमाशांच्या वसाहतीचे संरक्षण करणे, औषधी वनस्पतींचा आवश्यक तेवढाच वापर करणे आणि वनक्षेत्राचे नुकसान टाळणे अशा पध्दती पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त ठरतात.

 

अनेक आदिवासी गावांमध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून जंगलाच्या संरक्षणासाठी सामूहिक निर्णय घेतले जातात. जंगलातील आगीवर नियंत्रण, अवैध वृक्षतोड रोखणे, वन्यजीवांचे संरक्षण आणि वनक्षेत्राचे पुनरुज्जीवन यामध्ये स्थानिक समुदायांचा सहभाग महत्वाचा ठरतो.

 

*जैवविविधतेच्या संरक्षणात जनजातींचे योगदान*

 

जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव यांची समृध्द विविधता जंगलातील प्रत्येक पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्वाची भूमिका बजावतो. आदिवासी समाजाला आपल्या परिसरातील जैवविविधतेची पिढ्यानपिढ्या विकसित झालेली माहिती असते.

 

कोणत्या ऋतुमध्ये कोणती वनस्पती फुलते, कोणत्या झाडाला औषधी महत्व आहे, कोणती फळे खाण्यायोग्य आहेत, कोणत्या वन्यप्राण्यांचे आधिवास कुठे आहेत, याचे ज्ञान स्थानिक आदिवासी समुदायांकडे असते. हे ज्ञान वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरते. आदिवासी समाजातील देवराई आणि पवित्र वनक्षेत्रांची परंपरा ही जैवविविधता संवर्धनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. काही विशिष्ट वृक्ष, वनस्पती आणि वनक्षेत्रांना धार्मिक व सांस्कृतिक महत्व दिले जाते. अशा क्षेत्रांमध्ये वृक्षतोड किंवा अनावश्यक हस्तक्षेप टाळण्याची परंपरा असल्यामुळे अनेक स्थानिक वनस्पती आणि जीवसृष्टीचे संरक्षण होण्यास मदत होते. गडचिरोलीसारख्या वनसमृध्द जिल्ह्यात वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्रे, हरिण, सांबर, विविध पक्षी आणि औषधी वनस्पतींच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक समुदायांचे सहकार्य महत्वपूर्ण आहे.

 

*शाश्वत विकासासाठी पारंपरिक आदिवासी ज्ञान*

 

आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान हे पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनपध्दतीचे महत्वपूर्ण उदाहरण आहे. पारंपरिक शेती, मिश्र पीक पद्धती, स्थानिक बियाण्यांचे जतन, नैसर्गिक खतांचा वापर, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याच्या पद्धती त्यांच्या जीवनाचा भाग आहेत.

 

स्थानिक हवामान, मातीचा प्रकार आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन शेती करणे, विविध पिकांची लागवड करणे आणि स्थानिक बियाण्यांचे संरक्षण करणे यामुळे शेतीतील जैवविविधता टिकण्यास मदत होते. औषधी वनस्पतींचे ज्ञान हा आदिवासी समाजाचा आणखी एक महत्त्वाचा पारंपरिक वारसा आहे. सर्दी, ताप, जखमा आणि इतर सामान्य त्रासांसाठी विविध वनस्पतींचा पारंपरिक उपयोग केला जातो. या ज्ञानाचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करणे आणि स्थानिक समुदायांच्या बौद्धिक संपदा हक्कांचा सन्मान राखणे आवश्यक आहे.

 

*वनहक्क कायदा ग्रामसभांची भूमिका*

 

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अर्थात वनहक्क कायदा हा आदिवासी समाजाच्या वनधिकारांच्या दृष्टीने महत्त्वाचा कायदा आहे.

या कायद्यांतर्गत पात्र वननिवासी समुदायांना वैयक्तिक आणि सामुदायिक वनहक्कांची मान्यता देण्याची तरतूद आहे. विशेषतः कलम ३ (१) (१) नुसार सामुदायिक वनसंपत्तीचे सरंक्षण, संवर्धन, पुननिर्मिती आणि व्यवस्थापन करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला आहे.

 

ग्रामसभांना वनसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनात महत्वपूर्ण भमिका बजावता येते. गडचिरोली जिल्ह्यात सामुदायिक वनहक्कांच्या माध्यमातून अनेक गावांनी जंगली व्यवस्थापन, बांबू व्यवस्थापन, गौण वनोपज संकलन आणि वनसंवर्धनाचा उपक्रमांत सहभाग घेतला आहे. या प्रक्रियेमुळे आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक पर्यावरण व्यवस्थापन यांच्यात समन्वय निर्माण होऊ शकतो. वनसंवर्धनासोबत स्थानिक लोकांच्या उपजीवकेच्या संधी वाढविण्यासही मदत होते.

 

*गौण वनोपज आदिवासी अर्थव्यवस्थेचा आधार*

 

आदिवासी समाजाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गौण वनोपजाला विशेष महत्त्व आहे. मोहफुले, तेंदुपाने, बांबू, चारोळी, आवळा, हिरडा, बेहडा, मध, डिंक आणि इतर वनउत्पादने त्यांच्या उत्पन्नाचे महत्वाचे स्त्रोत आहेत, या वनोपजांचे योग्य संकलन, प्रक्रिया, साठवणूक, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्यास आदिवासी कुटुबांचे आर्थिक सक्षमीकरण होऊ शकते, महिला बचतगटांच्या माध्यमातून मोहफुलांपासून विविध उत्पादने, आवळा प्रक्रिया, बांबू हस्तकला, मध प्रक्रिया आणि वनौषधीजन्य उत्पादनांना प्रोत्साहन देता येते. यामुळे जंगलाचे सरंक्षण आणि आदिवासींचा आर्थिक विकास या दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता होण्यास मदत होते.

 

*हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणातील आदिवासी ज्ञान*

 

आज संपूर्ण जग हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढते तापमान, जंगलातील वणवे, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास अशा गंभीर समस्यांना सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाचे स्थानिक पर्यावरणविषयक ज्ञान महत्वाचे ठरते. पावसाचे पारंपरिक निरीक्षण, ऋतूचक्रानुसार शेतीचे नियोजन, स्थानिक जलस्त्रोतांचे संरक्षण, जंगलातील आगींची पूर्वकल्पना आणि वनस्पतींच्या उपलब्धतेतील बदल याबाबतचे त्यांचे अनुभव पर्यावरण संशोधनसाठी उपयुक्त ठरु शकतात. आदिवासी समाजाच्या अनुभवांना वैज्ञानिक संशोधनाची जोड देऊन हवामान बदलाशी जुळवून घेणारे स्थानिक विकासाचे मॉडेल तयार करता येऊ शकते.

 

*आदिवासी संस्कृती आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश*

 

आदिवासी समाजातील सण, उत्सव, लोकगीते, नृत्य, पारंपरिक श्रध्दा आणि सामूहिक जीवनपद्धती यांचा निसर्गाशी जवळचा संबंध आहे. वृक्ष, नद्या, पर्वत वन्यजीव आणि भूमी यांच्याबद्दल आदराची भावना त्यांच्या सांस्कृतिक परंपरेत दिसून येते. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात स्वाभिमान, संघटन आणि आपल्या भूमीवरील आधिकारांची जाणीव निर्माण केली. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आदिवासी संस्कृती, नैसर्गिक संसाधने आणि पारंपारिक जीवनमूल्यांचे संरक्षण करणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे.

 

*निसर्गसंवर्धनातून शाश्वत भविष्याचा संकल्प*

 

आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, जंगलाशी असलेले नाते आणि जैवविविधतेच्या संरक्षणातील योगदान ही देशाची अमूल्य संपत्ती आहे. विकासाच्या प्रक्रियेत आदिवासी समाजाचा सहभाग, वनहक्कांचे प्रभावी संरक्षण, ग्रामसभांचे सक्षमीकरण, स्थानिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि वनसंपत्तीचा शाश्वत वापर यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

 

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यामार्फत १५ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथे आयोजित भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिवस राज्यस्तरीय कार्यक्रम हा आदिवासी समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथा, परंपरा, चालीरिती, आदिम संस्कृती इत्यादीचे द्योतक आहे.आदिवासी समाजाकडून निसर्गाशी सहअस्तित्वाची शिकवण घेऊन पर्यावरणपूरक विकासाचा मार्ग स्वीकारणे ही काळाजी गरज आहे.

 

जंगल वाचले तर जीवन वाचेल, जैवविविधता टिकली तर पर्यावरण सुरक्षीत राहील. आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान करुया, निसर्गाचे संवर्धन करुया आणि पुढील पिढ्यांसाठी समृध्द पर्यावरणाचा वारसा जपूया.

 

जय आदिवासी, जय बिरसा !

 

 

श्रीमती रजनी गिरडकर

संशोधन आधिकारी,

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे विभाग पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments