पुणे, 13 नोव्हेंबर 2026: मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आरआयएसए आंतर क्लब रॅकेटलॉन अजिंक्यपद 2026 स्पर्धेत पीवायसी ब्लू संघाने सुवर्णपदक, तर पीवायसी रेड संघाने कांस्य पदक पटकावले.
विलिंगडन क्लब मुंबई येथे महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात पीवायसी ब्लू संघाने यूएस क्लब संघाचा 140-118 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून अनिश राणे, आदिती रोडे, आदित्य अभ्यंकर, पराग चोपडा, तनिश बेलगलकर यांनी सुरेख कामगिरी बजावली.
ही स्पर्धा टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॉश आणि टेनिस या चार खेळांमध्ये घेण्यात आली असून यामध्ये 2 पुरुष एकेरी सामने, 1 खुला दुहेरी सामना आणि 1 महिला एकेरी सामन्यांचा समावेश होता. प्रत्येक खेळाडूला एका सामन्यात या चारही खेळांमध्ये सहभाग घेणे अनिवार्य होते. प्रत्येक खेळासाठी 11 गुणांचा सामना खेळविण्यात आला. अशा प्रकारे प्रत्येक खेळाडूला चारही खेळांमध्ये मिळून एकूण 44 गुणांसाठी खेळावे लागत होते.
3ऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत निखिल चितळे, प्रांजली नाडगोंडे, तुषार नगरकर, आर्यन सुतार, ईशान लागू यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी रेड संघाने माटुंगा जिमखाना संघाचा 123-78 असा पराभव करत तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळवले.
इतर पारितोषिके:
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर(पुरुष): अनिश राणे;
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर(महिला): आदिती रोडे;
रायझिंग स्टार(पुरुष): निखिल चितळे;
रायझिंग स्टार(महिला): प्रांजली नाडगोंडे
.


