Saturday, November 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedरंगावलीतून उलगडला शिवचरित्रातील वैभवशाली इतिहास

रंगावलीतून उलगडला शिवचरित्रातील वैभवशाली इतिहास

‘राजा शिव छत्रपती’ प्रदर्शनात शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यनिर्मितीच्या प्रसंग रंगावलीतून साकार

शारदा अवसरे आणि सहकलाकार यांच्या वतीने आयोजन

 

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे स्वराज्यनिर्मितीचा ध्यास, शौर्याचा इतिहास आणि रयतेच्या कल्याणासाठी केलेल्या संघर्षाची प्रेरणागाथा. या प्रेरणागाथेतील ऐतिहासिक प्रसंगांना रंगावलीच्या माध्यमातून कलात्मक रूप देत ‘राजा शिव छत्रपती’ या प्रदर्शनातून शिवचरित्राचा वैभवशाली पट उलगडण्यात आला. अफजलखान वधापासून शिवराज्याभिषेकापर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटनांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या या रंगावल्यांनी इतिहास आणि कलेचा सुंदर संगम साधला.

 

शारदा अवसरे आणि सहकलाकार यांच्या संकल्पनेतून कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे, प्रसिद्ध रंगावलीकार अक्षय शहापूरकर आणि रंगावलीकार शारदा अवसरे उपस्थित होते. श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन, पुणे आणि प्रा. अक्षय शहापूरकर यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन लाभले.

 

अफजलखान वध, पावनखिंडीचा रणसंग्राम, स्वराज्याची शपथ, सोन्याचा नांगर, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट, शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग, बाल शिवबाला जिजाऊ मातांकडून मिळणारे संस्कार आणि शिवरायांचे आरमार अशा विविध ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण रंगावलीतून करण्यात आले. शिवराज्याभिषेकाची भव्य रंगावली प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरली. या रांगोळीचा आकार २३ फूट बाय १२ फूट असून यासाठी १० किलो रांगोळी आणि रंग वापरण्यात आले आहेत. स्वतः शारदा अवसरे , प्रियांका सातव , ऋतुजा पोतदार या कलाकारांनी ही रांगोळी साकारली आहे.

 

रंगावलीतील बारकावे, प्रसंगांची अचूक मांडणी आणि रंगांच्या माध्यमातून साकारलेले ऐतिहासिक क्षण यामुळे प्रेक्षकांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा कलात्मक अनुभव उपस्थितांनी घेतला. दिनांक २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

 

शारदा अवसरे म्हणाल्या, या प्रदर्शनात एकूण २१ रंगावल्या साकारण्यात आल्या असून, ४० कलाकारांनी सहभाग घेतला. रंगावलीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, स्वराज्याचा इतिहास आणि त्यामागील प्रेरणादायी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments