पुणे, दि. २२: भारत पोलिओमुक्त झाला असला तरी जगातील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचे अस्तित्व असल्यामुळे पोलिओ विषाणू पुन्हा भारतात येण्याचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर बालकांचे संपूर्ण लसीकरण करून त्यांना पोलिओपासून सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
बुथवर ० ते ५ वर्षे वयोगटातील २९ हजार २८० बालकांचे पोलिओ लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली कार्यक्षेत्रात करण्यात आले. मोहिमेचा शुभारंभ आमदार माऊली (आबा) कटके व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली येथे पोलिओची लस पाजून करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या श्रीम कोमल आव्हाळे, सुरेखाताई हरगुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती हवेली डॉ. सुरेश गोरे, मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी दिनकर कदम, विस्तार अधिकारी हवेली सुधाकर चाबुकस्वार, आरोग्य साहाय्यक सुरेश सोनवलकर, आरोग्य सेवक पंकज कामत आदी उपस्थित होते.
या मोहिमे अंतर्गत डोस न पाजण्यात आलेल्या बालकांना ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस प्रत्यक्ष घरभेटीद्वारे पोलिओचे डोस पाजण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच डॉ रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व शहरी भागातील सर्व पात्र वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी आरोग्य विभागाने घ्यावी असे आवाहन केले.
जन आरोग्य समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोलीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या श्रीम कोमल आव्हाळे यांनी TRANSIT TEAM व मोबाईल बूथच्या मदतीने परिसरातील एकही बालक पोलिओच्या डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
००००


