Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीक सुधारणा, अन्नसुरक्षेसाठी पुण्यात राष्ट्रीय परिषद एमआयटी-एडीटी विद्यापीठ,...

पीक सुधारणा, अन्नसुरक्षेसाठी पुण्यात राष्ट्रीय परिषद एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे आणि सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

 

 

पुणे : वनस्पती जनुक अभियांत्रिकी, मेटाबोलॉमिक्स (चयापचयशास्त्र) आणि शाश्वत अन्नव्यवस्था या क्षेत्रांतील आधुनिक संशोधन, तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधींवर विचारमंथन करण्यासाठी पुण्यात २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या परिषदेचे संयुक्त आयोजन एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथील स्कूल ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे यांच्या वतीने सोसायटी फॉर प्लांट बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी (SPBB), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. ही परिषद यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA), बाणेर, पुणे येथे आयोजित केली जाणार आहे.

 

कृषी उत्पादकता वाढविणे, हवामान बदलास अनुकूल आणि प्रतिकारक्षम पीकजाती विकसित करणे, अन्नाची गुणवत्ता व पोषणमूल्य सुधारणे आणि भविष्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करणे यामध्ये आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

 

परिषदेत वनस्पती जैवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, हवामान बदलास अनुकूल पीक संशोधन, वनस्पती मेटाबोलॉमिक्स, प्रणाली जीवशास्त्र (Systems Biology), वनस्पती-सूक्ष्मजीव परस्परसंवाद, अन्नतंत्रज्ञान आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनातील नवकल्पना अशा महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन होणार आहे.

 

पीक सुधारण्यासाठी जनुकीय अभियांत्रिकी, शाश्वत शेतीसाठी जैवविविधतेचा उपयोग, हवामान बदलास प्रतिकारक्षमतेशी संबंधित जनुकांची ओळख, मल्टी-ओमिक्स तंत्रज्ञान, मेटाबोलॉमिक्स, कार्यात्मक अन्नपदार्थ (Functional Foods), पोषणसुरक्षा तसेच शाश्वत अन्नप्रणाली विकसित करण्यासाठी संगणकीय जीवशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर या विषयांवर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत.

 

या परिषदेचे प्रमुख आकर्षण म्हणजे डॉ. एन. बी. दास स्मृती व्याख्यान. हे व्याख्यान भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (INSA) अध्यक्ष, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) माजी महासंचालक तसेच भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाचे (DSIR) माजी सचिव प्रा. शेखर मांडे देणार आहेत.

 

या परिषदेला कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. एम. एल. जाट, तसेच एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलपती आणि कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यासह, सीएसआयआर-एनसीएल, पुणेचे संचालक डॉ. आशिष लेले आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

 

आयसीएआरचे राष्ट्रीय प्राध्यापक, बी. पी. पाल चेअर आणि एसपीबीबीचे अध्यक्ष प्रा. टी. आर. शर्मा हे परिषदेचे अध्यक्ष असून, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय हरसुलकर हे निमंत्रक आहेत. परिषदेच्या आयोजनासंदर्भात स्कूल ऑफ फूड टेक्नॉलॉजीच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. अंजली ए. भोईटे आणि सीएसआयआर-एनसीएलचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र कडू यांनी ही माहिती दिली.

 

 

———————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments