पुणे, दि. २६ : सेवा वस्त्यांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र गायकवाड यांनी केले. सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने येरवड्यात आयोजित ‘दिवाळी एकात्मता महोत्सवा’त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राजेंद्र गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी २५ नृत्याविष्कार सादर केले.
संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून राज्यात संविधान जागृतीचे कार्य करणाऱ्या राजेंद्रजी गायकवाड यांच्या उपस्थितीने महोत्सवाची रंगत वाढली. या वेळी सुमारे ५०० नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना दाद दिली. महोत्सवात २५० विद्यार्थ्यांनी २५ विविध गीतांवर नृत्याविष्कार सादर केले. शेतकरी जीवन, जागरण-गोंधळ, दुष्काळ, भारूड, मल्याळम संस्कृती आणि गवळण या विषयांवरील सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक सादरीकरणातील उत्कृष्ट कलाकृतींना चार क्रमांकांची व एक उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. दिवाळीनिमित्त किल्ले बनविणे, रांगोळी, आकाशकंदील आणि पणती रंगविणे या स्पर्धांमध्ये १२०० विद्यार्थी व महिलांनी सहभाग घेतला; त्यातील ८६ विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार वैष्णवी हौसमनी यांना प्रदान करण्यात आला. साक्षी सोनवणे, भावेश कांबळे, मोनिका तुळवे आणि गणेश स्वामी यांचा विशेष सत्कार झाला.
कार्यक्रमास सुराज्य प्रकल्पाचे संस्थापक सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शिवले, निलेश ओव्हाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे येरवडा भाग संघचालक थानाराम चौधरी, भाग कार्यवाह श्रीकांत मल्लारेडी, मनोज पोचट, सह सेवा प्रमुख प्रदीप मोदी, मंदार जोशी, नरेश करपे, मुकुंद अय्यर आणि विश्वास कुलकर्णी उपस्थित होते. सविता भांगरे आणि ऋतिक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. येरवडा, विश्रांतवाडी आणि विमाननगर परिसरातील सेवा वस्त्यांमध्ये ‘सुराज्य’ प्रकल्प १ मे २००१ पासून शिक्षण, महिला सक्षमीकरण, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि बालनंदन खेळघराच्या माध्यमातून कार्यरत आहे.
————


