पुणे, २५ एप्रिल २०२४ :- मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये ७२३ मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात आली असून ११ हजार ६९० सदस्यांद्वारे जिल्ह्यात मतदार जागृती करण्यात येत आहे. येत्या ७ मे रोजी बारामती व पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असून ७ व १३ मे रोजी मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या मतदार जागृती मंचाच्या माध्यमातून सदस्यांना मतदानाची शपथ देणे, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, मतदार जागृतीपर रॅली तसेच पथनाट्य आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदार जागृती मंचाच्या सदस्यांनी आपल्या कुटुंबियांना, परिसरातील नागरिकांना तसेच मित्र परिवारांना मतदानाबाबत जागृत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यात मतदार जागृती मंचाच्या माध्यमातून आत्तापर्यंत एकूण ८५० हून अधिक मतदान जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मतदानाबाबत जागृती करण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविणेसाठी मतदार जागृती मंचाची भूमिका महत्वाची ठरेल, असा विश्वास स्वीप नोडल अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी व्यक्त केला आहे.


