Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedहर्नियासह इतर गंभीर गुंतागुंत झालेल्या 57 वर्षीय रूग्णावर यशस्वी फंडोप्लिकेशन प्रक्रिया

हर्नियासह इतर गंभीर गुंतागुंत झालेल्या 57 वर्षीय रूग्णावर यशस्वी फंडोप्लिकेशन प्रक्रिया

पुणे,21 मे 2024 : कसबा पेठ येथील समर्थ युनिव्हर्सल हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या टीमने हर्नियासह इतर गंभीर गुंतागुंत झालेल्या 57 वर्षीय रूग्णावर फंडोप्लिकेशन प्रक्रिया यशस्वीरित्या केली. उपचार करणाऱ्या टीममध्ये जनरल सर्जन डॉ.संजय शिवदे, जनरल फिजिशियन डॉ.विद्याधर शिवदे, डॉ.अनंत बागुल, भूलतज्ज्ञ डॉ.प्रसाद आंबेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा वाकडे, डॉ.स्मिता भोयर यांच्यासह कर्मचारी आम्रपाली देवडे, अनिकेत हिरवे, दीपक खुशवाहा आणि दिलीप मामा यांचा समावेश होता. आर्थिकदृष्ट्या कठिण परिस्थितीत असलेल्या व व्यवसायाने मजूर असलेला हा रूग्ण गुंतागुंतीच्या स्थितीत होता.

याविषयी बोलताना भूलतज्ञ व समर्थ युनिव्हर्सल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.प्रसाद आंबेकर म्हणाले की,जेव्हा हा रूग्ण आमच्याकडे आला होता,तेव्हा त्यांच्या पोटात व छातीत तीव्र वेदना होत होत्या.त्यांना अन्न गिळता येत नव्हते,कारण अन्न घशाखाली जात नव्हते.परिणामी ते सहा महिन्याहून अधिक काळ पेय पदार्थ घेत होते.त्यामुळे रक्तातील प्रथिनांची पातळी कमी झाली होती (हायपोप्रोटिनेमिया) व तीव्र रक्ताशय झाला होता.त्यांची हिमोग्लोबीनची पातळी 7 ग्रॅमपर्यंत खाली आली होती.पेयपदार्थांवर असल्याने वजन कमी झाले होते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती.

निदान केले असता हायटस हर्निया असल्याचे समोर आले.जेव्हा कुठलाही अवयव किंवा पेशी कमकुवत आवरणाच्या बाहेर येतात तेव्हा त्याला हर्निया म्हणतात. हायटस हर्नियामध्ये पोटाचा वरचा भाग श्‍वास पटलातून (डायफ्रॅम) छातीच्या पोकळीत वर ढकलला जातो.त्यामुळे त्यांना पोटात आणि छातीत तीव्र वेदना होत होत्या.

अन्ननलिका आणि पोटातील स्थिती जाणून घेण्यासाठी एक्स-रे आणि एंडोस्कोपी या निदान चाचण्या करण्यात आल्या.

शल्यचिकित्सक डॉ.संजय शिवदे म्हणाले की, हायटस हर्निया व्यतिरिक्त त्यांची परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची होती,कारण हेपॅटायटिस सी (एचसीव्ही पॉझिटिव्ह) संसर्ग असल्याचे निदान झाले होते.हेपॅटायटिस सी मुळे त्यांच्या यकृतावर सूज आली होती.याशिवाय रूग्णावर याआधी देखील हर्नियाकरिता लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.रूग्णाला तंबाखू सेवनाची सवय होती आणि जबड्यात कडकपणा असल्याने तोंड नीट उघडता येत नव्हते. शस्त्रक्रियेदरम्यान कृत्रिम श्‍वासोच्छश्‍वासासाठी हे एक मोठे आव्हान होते आणि अशा परिस्थितीत भूल देणे अतिशय जोाखीमकारक होते. ही सर्व आव्हाने पेलवत आमच्या टीमने खुल्या शस्त्रक्रियेद्वारे फंडोप्लिकेशन प्रक्रिया केली.

फंडोप्लिकेशन ही शस्त्रक्रिया अ‍ॅसिड रिफ्लक्स व हायटस हर्नियासाठी केली जाते.या प्रक्रियेमध्ये शल्यचिकित्सक श्‍वासपटलातून अन्ननलिका जिथून जाते ती जागा (हायटल) ती घट्ट करतात.पोटाचा वरचा भाग ज्याला फंडस म्हणतात,त्याला अन्ननलिकेच्या खालच्या भागाभोवती शिवले जाते.या रूग्णाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता,ही प्रक्रिया मोफत करण्यात आली.हा रूग्ण आता प्रगतीपथावर असून तीन आठवड्यात आपल्या दैनंदिनीमध्ये पूर्ववत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments