पुणे, दि. 12 जून – भारत सरकारचे संस्कृती मंत्रलाय, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या सहयोगाने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्राचीन हस्तलिखिते, ग्रंथसंपदा आणि दुर्मिळ वस्तूंचे संवर्धन करण्यासंबंधीचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करीत असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप आपटे आणि संवर्धन विभागप्रमुख वर्षा कोटफोडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देतांना आपटे पुढे म्हणाले की, येत्या ऑगस्ट 2024 पासून सुरु होणारा एक वर्ष कालावधी असलेला हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून तो इंग्रजी माध्यमातून शिकवला जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधारक यासाठी प्रवेश घेऊ शकतो, ज्याला वयाचे कोणतेही बंधन नाही. भारतीय वैज्ञानिक वारसा आणि परंपरा, संस्कृती, तत्वज्ञान या विषयांना भारतीय ज्ञान प्रणालीमधील असलेले स्थान लक्षात घेवून या अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. ज्यात या विषयांबरोबरच दुर्मिळ आणि प्राचीन वस्तूंचे संवर्धन करण्याची शास्त्रशुध्द पध्दती यामध्ये शिकवली जाणार आहे.
यावेळी कोटफोडे म्हणाल्या की, आज भारतात संग्रहालय क्षेत्रात प्रशिक्षित संरक्षक, पुनर्संचयित करणारे, अभिलेखशास्त्रज्ञ आणि संग्रह व्यवस्थापकांची नितांत गरज आहे. तसेच सरकारी संग्रहालये आणि खाजगी संग्रहालये तसेच अभिलेखागार, ग्रंथालये, विद्यापीठ संग्रह, धार्मिक संस्था, कलादालन इत्यादींमध्ये भारतभर पसरलेले विविध संग्रह आहेत, ज्यात अशा शिक्षीतांची फार गरज आहे. विद्यार्थ्यांनी वारसा आणि संग्रहालय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणे आवश्यक आहे.
यावेळी बोलतांना पटवर्धन म्हणाले की, भांडारकर संस्थेतील दुर्मिळ अशा सुमारे 17 हजार हस्तलिखितांचे शास्त्रशुध्द पध्दतीने जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे. संवर्धन विभाग त्यासाठीच संस्थेने सुरु केला आहे, त्यादृष्टीने हा पदविका अभ्यासक्रम प्रथमच सुरु करीत आहोत. याचा जरुर लाभ विशेषत: तरुण विद्यार्थ्यांनी अधिक घ्यावा, असे आवाहन आहे.
——–चौकट ——–
भांडारकर संस्थेमधील ऋग्वेदाचे हस्तलिखित, जे काश्मिरमधील असून प्राचीन अशा शारदा लिपीमध्ये आहे, ते 2007 साली युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये नोंदवले गेले आहे आणि आता ध्वन्यालोक आणि पंचतंत्र हे भांडारकर संस्थेमधील आणखी दोन ग्रंथ देखील मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये नोंदवले गेलेले आहेत. ध्वन्यालोक ग्रंथाचे महत्व असे आहे की, संस्कृत काव्यशास्त्रामध्ये त्यांनी नवीन ध्वनी विचार हा आणलेला होता आणि पंचतंत्र हे अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं नितीशास्त्रामधील वाड्.मय आहे, असं भारताने युनेस्कोमध्ये प्रतिपादन केले होते व ते मान्य झाले आहे. ही जुनी असूनही अत्यंत चांगली हस्तलिखिते भांडारकर संस्थेत आहेत, ज्याची नोंद युनेस्कोने केलेली आहे. हे काम इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स या दिल्लीमधल्या संस्थेमधील डॉ. रमेशचंद्र गौर यांच्या सहकार्याने झालेले आहे. नुकत्याच मंगोलियामधील उलनबटोर येथे झालेल्या युनेस्कोच्या परिषदेमध्ये या दोन ग्रंथांना समाविष्ट करुन घेण्याची घोषणा देखील झालेली आहे, अशी माहिती संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट यांनी यावेळी दिली.
*भांडारकर संस्थेत प्राचीन हस्तलिखितांपासून दुर्मिळ वस्तूंचे संवर्धन करणारा पदविका अभ्यासक्रम*
RELATED ARTICLES


