Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीशिवचरित्र साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज नगरी, जळगाव

श्रीशिवचरित्र साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज नगरी, जळगाव

पुणे, १८ जून २०२४ : २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रीशती वर्ष आहे. याच प्रसंगाचे औचित्य साधून दिनांक २६ जून ते २९ जून २०२४ दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर छत्रपती शिवाजी महाराज नगरीत श्रीशिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनास बारा मावळ प्रांतातील नद्या आणि गडदेवता येणार आहेतच शिवाय शिवनेरीची आणि रायगडाची माती पण येणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने शिवरायांच्या स्वराज्य विषयीचा दृष्टीकोन म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार म्हणजेच मराठ मावळा हा संमेलनास सामील व्हावा हा उद्देश आहे.

संपूर्ण विश्वभरात हजारो साहित्य संमेलन आयोजित केले जातात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र साहित्यावर कधीही, कुठेही आणि कुणीही साहित्य संमेलन आयोजित केले नाही आणि आजवर ते कुठेही झाले नाही. त्या साहित्यावर मंथन व्हावे आणि त्यातून एक नवा वास्तववादी प्रवाह समाज क्षेत्रासाठी खुला व्हावा या उद्देशाने या संमेलनाच प्रयोजन होत आहे. या विश्वस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे असणार आहेत, तसेच या संमेलनाचे अध्यक्ष शककर्ते शिवराय या विश्वप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक माननीय शिवकथाकार श्री विजयराव देशमुख नागपूर हे असणार आहेत. या संमेलनास कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या गादीचे वारस श्रीमंत शिवाजीराजे भोसले आणि नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजीराजे भोसले हे उपस्थित असणार आहेत. सोबतच छत्रपती शिवरायांचे सोबत असणारे ७५ सरदार घराण्यांचे वारसदारही येणार आहेत.

या संमेलनात शिवकालीन शस्त्रे, नाणी, पगड्या, महाराजांचे आरमार, विरगळ, समाधी स्थाने चित्रे या विषयांवरील विविध प्रदर्शन, शाहीरी पोवाडे, जागरण, गोंधळ, भारुड यांचे सादरीकरण होणार असून शिवपूर्वकालीन व शिवउत्तरकालीन संत साहित्य, आणि शिवराज्याभिषेक – गरज, उपलब्धी व दूरगामी परिणाम यावर विशेष चर्चासत्र रंगणार आहे. या संमेलनामध्ये श्रीशिवछत्रपतींचे चरित्र शक्ती आणि भक्ती, श्रीशिवछत्रपतींची पत्रे, श्रीशिवछत्रपतींना अवगत असलेले नकाशा तंत्र, भारतीय ज्ञान परंपरा आणि श्रीशिवछत्रपती, छत्रपतींचे मुलकी व्यवस्थापन, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी धोरण, शाहू फुले आंबेडकर यांच्या दृष्टिक्षेपातील छत्रपती शिवराय या आणि अशा अनेक विषयांवर भारतातले अनेक मान्यवर अभ्यासक आपले मत व्यक्त करणार आहेत.

हे संपूर्ण संमेलन नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे होणार असून इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र आणि नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वनसंपदा बहुउद्देशीय संस्था धरणगाव, राधेश्याम एज्यूसोशल फाउंडेशन छत्रपती संभाजी नगर, गड संवर्धन प्रतिष्ठान पुणे, कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र, आणि श्री. दादासाहेब केशवराव भोईटे इतिहास संशोधन मंडळ जळगाव यांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदालन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील पुस्तक विक्रेते प्रकाशक आपला सहभाग घेणार आहेत. आपण जास्तीत जास्त संख्येने या संमेलनात सामील व्हावे असे आवाहन या संमेलनाचे निमंत्रक मा. प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख आणि नियंत्रक श्री.रवींद्र पाटील पाचोरा यांनी कळविले आहे. या प्रसंगी संमेलनाच्या आयोजन समिती सदस्य श्री संदीपजी तापकीर, श्री शंकरराव जाधव उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क – मंगेश बरबडे – ९९२१२३७९९९

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments