पुणे. २६ जून २०२४ : सध्या पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी भाविकांची पायी वारी सुरू झाली आहे. भाविक भक्तिभावाने विठू माऊलीच्या दर्शनाला जाऊ लागले आहेत. अशा वेळी हडपसर येथील मंत्री मार्केट मधील रहिवासी आणि बिशप स्कूल, कॅम्पचा इयत्ता सहावी मधील विद्यार्थी कु. सुमित सुधीर लोखंडे याने एका दिवसात सतत २०३ किमी सायकल चालवून पंढरीची वारी पूर्ण केली आहे. पर्यावरण संवर्धन आणि शारीरिक स्वास्थ्याचा संदेश देण्याचा हेतूने सुमित ने ‘भक्तिभावाची किमया न्यारी, सायकल वर पंढरीची वारी’ या उप्रकमाद्वारे ही सायकल वारी पूर्ण केली आहे. २५ जून रोजी सकाळी ३ वाजता हडपसर येथून सुरू केलेली सायकल वारी सायंकाळी ५ वाजता माऊलींच्या मंदिरा समोर पोहचून यशस्वीपणे पूर्ण केली आहे. वयाच्या १२ व्या वर्षी एका दिवसात सातत्याने १४ तासांत २०३ किमी चा सायकल वारी टप्पा पूर्ण करून अनोखा विक्रम रचला आहे. त्याचबरोबर याद्वारे सामाजिक व शारीरिक स्वास्थ्याचा उपदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न ही सुमित ने केला आहे. हडपसर, सोलापूर रोड, टेंभुर्णी ते पंढरपूर अशी सुमितने ही सायकल वारी पूर्ण केली. यावेळी सुमित चे वडील सुधीर लोखंडे, श्लोक धुमाळ, संदीप धुमाळ यांची त्याला सोबत व मार्गदर्शन मिळाले. एक चांगला उपक्रम यशस्वी करून सुमितने अनोखा विक्रम नोंदवला आहे. याबद्दल सुमितचे सर्व ठिकाणांहून कौतुक होत आहे.


