पुणे, दि. ३०: आषाढी वारीचे औचित्य साधून कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना कौशल्याबाबतचे ज्ञान, विविध योजना व उपक्रमांची माहिती अवगत होण्याच्यादृष्टीने पुणे शहरात २ जुलै रोजी कौशल्य विकास दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयाने दिली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून, आयुक्त निधी चौधरी व संचालक डी.ए. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याबाबतचे ज्ञान नागरिकांना अवगत करण्याच्या अनुषंगाने कौशल्य विकास दिंडीचे २ जुलै रोजी पुणे शहरातील गोळीबार मैदानापासून ते हडपसर येथील गाडीतळ पर्यंत आयोजन करण्यात येणार आहे.
स्वतः मंत्री श्री. लोढा भैरोबा नाला ते मगरपट्टा चौक दरम्यान दिंडीत सहभागी होतील. पुणे शहरातील व जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्व व्यावसायिक संस्था, किमान कौशल्य आधारीत संस्था, द्विलक्षी अभ्यासक्रम संस्था, प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्था आणि कौशल्य विकास विद्यापीठ तसेच रोजगार स्वयंरोजगार विभागाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप उपक्रमाचे लाभार्थी, ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातील, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थीदेखील या दिंडीत सहभागी होणार आहेत.
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कौशल्य विकास दिंडीला भेट देऊन कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची व उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.


