वंशवृक्ष, पर्व, जा ओलांडुनी, धर्मश्री, तंडा, काठ, सार्थ या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांना भूरळ घालणारे, लोकप्रिय कन्नड कादंबरीकार, देशाच्या पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आदरणीय ‘डॉ.एस.एल.भैरप्पा’ यांना प्रत्यक्ष ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून उपलब्ध होणार असल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सव आणि या कार्यक्रमाचे निमंत्रक राजेश पांडे यांनी दिली आहे.
भैरप्पा यांचे साहित्याचे अनुभव आणि विचार आज (बुधवारी, ३ जुलै) सायंकाळी ६.०० वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात प्रत्यक्ष ऐकता येणार आहेत. अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी भैरप्पा यांची मुलाखत घेणार असून, त्यांचा पाच दशकांचा लेखन प्रवास उलगडणार आहेत.
नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, साहित्य अकादमी समितीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक, भैरप्पा साहित्याच्या अभ्यासक डॉ. उमा रामराव, कशीर कादंबरीच्या लेखिका सहना विजयकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


