मध्यम आणि मोठ्या उद्योगांना उत्पादने पुरविणाऱ्या लघुउद्योगांना मनुष्यबळ उपलब्धी व सर्व शासकीय व खासगी आयटीआयना प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त येत्या २७ जुलै रोजी शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. युवकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. मात्र अतिवृष्टीने पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीमुळे रोजगार मेळावा पुढे ढकलण्यात आला असून, नवीन तारीख लवकरच कळविले जाईल अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी कळविले आहे.
मेळाव्याच्या दृष्टीने विविध पातळीवर पूर्वतयारीही करण्यात आली होती आणि अनेक युवक-युवतींचा प्रतिसादही मिळतो आहे. तथापि जिल्ह्यात निर्माण झालेली आपत्कालिन परिस्थिती लक्षात घेता या संकटातून नागरिकांना बाहेर काढणे आणि मदत कार्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेसोबत स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधीदेखील या कार्यात व्यस्त आहेत. तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीत मेळाव्याला येणाऱ्या उमेदवारांची सुरक्षा महत्वाची आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता आणि हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने विद्यार्थ्यांना या मेळाव्यास उपस्थित राहण्यास निर्माण होणारी अडचण व प्रशासकीय यंत्रणेला आपत्ती निवारणाचे असलेले काम लक्षात घेता सदरचा रोजगार मेळावा पुढे ढकण्यात आला आहे. लवकरच मेळाव्याची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल.


