Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड शहरांतील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र पथक

पिंपरी -चिंचवड शहरांतील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र पथक

पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२४ :- शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमून आढळून आलेले सर्व खड्डे तातडीने बुजवा, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले.

 

पिंपरी चिंचवड शहरात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे विविध भागात रस्त्यांवर खड्डे पडणे, कचरा अडकून रस्त्यात पाणी साचणे अशा तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त सिंह यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

 

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर खड्डे बुजविण्यासाठी फिरते पथके नेमण्यात यावेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी आणि स्थापत्य कार्यकारी अभियंता यांनी आपल्या आधिपत्याखालील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत परिसरातील रस्त्यांची पाहणी करावी. रस्त्यांमध्ये आढळून आलेले खड्डे बुजविणे, पाण्याचा निचरा करण्यासाठी मार्ग करून देण्याबाबतची कार्यवाही पथकांमार्फत जलदगतीने करावी, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

 

शहरात रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून रस्त्यांवर बेकायदेशीरपणे बांधकाम साहित्य ठेवणे, राडारोडा टाकणे, रस्त्यांमध्ये बेकायदेशीरपणे खोदकाम करणे, चर खोदणे असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

 

धरणातून पाण्याचा विसर्ग :- शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत असून त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे शहरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शहरात नदीकाठावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी मदतीसाठी ०२० ६७३३११११ / ०२० २८३३११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments