*ठाणे दि.20 (जिमाका) :* ठाणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील कॅम्पस अँबेसेडर व त्यांचे समन्वयक यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न झाली. या माध्यमातून स्वीप अंतर्गत जिल्ह्यामध्ये मतदान जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, तथा स्वीप नोडल अधिकारी सुनिल पवार, भिवंडी निजामपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, तथा स्वीप नोडल अधिकारी विठ्ठल डाके,मिरा-भाईंदर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, तथा स्वीप नोडल अधिकारी अनिकेत मानोरकर, उल्हासनगर महानगरपालिका उपायुक्त,तथा स्वीप नोडल अधिकारी किशोर गवस, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त संजय जाधव,उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, तहसिलदार (स्वीप) स्मिता मोहिते, तहसिलदार उज्वला भगत ,नायब तहसिलदार स्मितल यादव उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित नव मतदार नोंदणी, मतदार यादी दुरुस्ती, नावात दुरुस्ती करणे याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच 100% नव मतदार नोंदणी करण्याकरिता आणि मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्याकरिता संकल्प करण्यात आला. या कार्यशाळेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मतदानाबाबत जनजागृती करण्याकरिता कॅम्पस अँबेसेडर यांना प्रोत्साहित करण्यात आले. सर्व अतिरिक्त आयुक्त या मोहिमेचे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नोडल अधिकारी असतील. तर संबंधित कॉलेजचे प्राध्यापक हे तेथील नोडल अधिकारी असतील. ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसिलदार स्मिता मोहिते यांनी केले,तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसिलदार उज्वला भगत यांनी केले.
00000000000


