पुणे,23 सप्टेंबर 2024 : झपाट्याने प्रगती करणाऱ्या भारतीय अंतराळ क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी येथे नुकतेच सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेक्स्टजेन स्पेस टेक्नोलॉजी केंद्र सुरू करण्यात केले आहे. या केंद्राचे उद्घाटन एअर वाइस मार्शल राजीवा रंजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.राकेश जैन,सायबर,एरोस्पेस सुरक्षा आणि दहशतवादविरोधी विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ निशाकांत ओझा यांसह वरिष्ठ कर्मचारी व सदस्य उपस्थित होते.
हे केंद्र प्रगत उपकरणांसह अत्याधुनिक सुविधा प्रदान करणार असून विद्यापीठात यामुळे अभिनवतेच्या संस्कृतीला अधिक प्रोत्साहन मिळेल. येथे संरचित उपक्रम प्रदान केले जाणार असून यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट-टर्म सर्टिफिकेट कोर्सेस तसेच संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, व्यावसायिक आणि तंत्रज्ञांसाठी सर्टिफिकेट कोर्सेस यांचा समावेश आहे. संशोधन,सहयोग आणि उद्योजकता यावर भर देऊन, नवीनतम कौशल्ये आणि सर्वोत्तम पध्दतींनी सुसज्ज अशा वैज्ञानिक परिषदा यांचा समावेश असेल. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि व्यावसायिक दोघांसाठी अंतराळ क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील.
एअर वाइस मार्शल राजीवा रंजन म्हणाले की, भावी पिढी घडविण्यामध्ये शिक्षण क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असते.हे तरूण आपल्या देशाच्या तंत्रज्ञानाला नव्या उंचीवर घेऊन जातात.शांततापूर्ण हेतूंसाठी नवीन घडामोडींचे तपशीलवार वर्णन करताना त्यांनी कृषी आणि स्पेस कम्युनिकेशन्स सारख्या क्षेत्रांचा दाखला दिला.तंत्रज्ञानाची सुरूवात ही शैक्षणिक आणि संशोधन प्रयोगशाळांमध्ये होत असते आणि नंतर उद्योगांपर्यंत व अंतिमत: वापरकर्र्त्यांपर्यंत पोहचते.त्यामुळे या सर्व घटकांमध्ये समन्वयाची गरज आहे आणि हे केंद्र ही गोष्ट साध्य करेल असा मला विश्वास आहे.ते म्हणाले की,एडीवायपीयूमध्ये एरोस्पेस आणि स्पेस तंत्रज्ञान विभागांमुळे उपयुक्त शैक्षणिक सुविधा आहेत.त्याचबरोबर पुण्यातील संबंधित संस्थांच्या दोलायमान परिसंस्थेमुळे या केंद्रातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व फायदा होईल.
अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी (एडीवायपीयू) चे अध्यक्ष डॉ.अजिंक्य डीवाय पाटील म्हणाले की,वैशिष्टयपूर्ण शिक्षणपध्दती,नाविन्यपूर्ण संशोधन व अध्यापन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेद्वारे समाजावर सकारात्मक प्रभावासाठी आमचे विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे.या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण, नाविन्यपूर्ण कौशल्ये आणि तंत्रज्ञानाने सक्षम करण्याबरोबरच भविष्यात जागतिक स्तरावर व्यावसायिक म्हणून घडविण्यासाठी उद्योजकीय आणि सहयोगी मानसिकता विकसित होण्यास मदत होईल.
ते पुढे म्हणाले की,भारत हे अंतराळ क्षेत्रात नवी शक्ती म्हणून उदयास येत असताना जगाला परडणारे आणि सुलभ अंतराळ तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान देऊ शकतील अशा मोठ्या संख्येने व्यावसायिक आणि उद्योजकांची नितांत गरज आहे.या केंद्राद्वारे अवकाश संशोधन शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडविण्याची क्षमता आहे.
अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.राकेश जैन म्हणाले की, इस्त्रोच्या चांद्रयान सारख्या यशस्वी व अभूतपूर्व कामगिरीने युवांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे,ज्यामुळे आता अंतराळ तंत्रज्ञानाबाबत माहिती घेण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचे खाजगीकरण आणि व्यावसायीकरण यामुळे भविष्यातील करिअरसाठी देखील मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. हे केंद्र विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा शोध घेण्यास आणि या क्षेत्रातील क्षमता जाणून घेण्यास मदत करेल.
सायबर,एरोस्पेस सुरक्षा आणि दहशतवादविरोधी विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ निशाकांत ओझा म्हणाले की, सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या केंद्रामध्ये सॅटेलाईट टेक्नोलॉजी,अंतराळ आधारित सेन्सर्स,मिसाईल डिफेन्स सिस्टिम,ॲडव्हान्स्ड प्रोपलशन सिस्टिम आणि अंतराळातील मालमत्तेसाठी सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांबाबत शिक्षण घेण्याची संधी मिळेल. अंतराळ तंत्रज्ञानामधील अत्याधुनिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करत नेक्स्टजेन स्पेस टेक्नोलॉजी केंद्र विशेष करून डिफेन्स ॲप्लिकेशन्वर
देखील भर देईल.


