पुणे, दि.१० : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) संस्कृती अध्ययन केंद्रातर्फे साताऱ्याजवळील मौजे नरबदेव येथील मेरूलिंग या पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिराचे दस्तावेजीकरणावर नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत बीएनसीएतील १६ विद्यार्थिनी सहभागी झाल्या असून लवकरच या ऐतिहासिक मंदिरावरील दस्तावेजावर अभ्यासकांसाठी एक स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येत आहे.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रोत्साहनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. डॉ. चेतन सहस्रबुद्धे आणि संस्कृती अध्ययन केंद्राच्या प्रमूख डॉ. वैशाली लाटकर यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले. प्रा. देवाप्रसाद आणि प्रा. सायली कुलकर्णी यांनी ‘इमर्सिव्ह फोटोग्राफी’ (थेट अनुभूती देणारे छायाचित्रण) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचे दस्तावेजीकरण कसे करतात, याचे यावेळी प्रात्यक्षिक दाखवले.
मेरूलिंग या शिवमंदिराचा विकास ब्रझेंद्रस्वामींनी अठराव्या शतकामध्ये केला असून हे मंदिर एका डोंगरावर दुर्गमस्थानी वसलेले आहे. पेशवे काळाच्या आरंभी विकसित झालेल्या या देवस्थानाच्या वास्तूकलेवर गोव्यातील वास्तूकलेचा प्रभाव आढळतो, असे डॉ. सहस्रबुद्धे आणि डॉ. लाटकर यांनी सांगितले. या देवळाच्या बांधकामासाठी कोकणात सापडणारा जांभा दगड वापरण्यात आला, असेही ते म्हणाले.
डॉ. कश्यप म्हणाले की, आसपासच्या अपरिचित दूरगामी अंतरावरील ऐतिहासिक वारसा शोधून तो जगापुढे आणण्याचे मोलाचे काम आम्ही करत आहोत. त्यानुसार मेरूलिंग मंदिरावरील या अभ्यासावर एक छापील पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहोत. इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी तो एक महत्त्वाचा स्त्रोत राहील.


