Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedरा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात - संघाचा शताब्दी वर्षात...

रा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात – संघाचा शताब्दी वर्षात प्रवेश – बारा हजार स्वयंसेवकांचा सहभाग – वस्ती व सोसायट्यांमधून संचलनांचे भव्य स्वागत

पुणे, ता. १३ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने शनिवारी (१२ ऑक्टोबर) रा.स्व. संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५८ ठिकाणी सघोष संचलने काढण्यात आली. पुणे महानगरात नऊ भागातील विविध ५५ नगरांमध्ये काढण्यात आलेल्या संचलनांमध्ये एकूण बारा हजारांहून अधिक पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. महानगरात सर्व उपनगर व वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) सर्व स्तरातील नागरिकांनी पथसंचलनाचे जोरदार स्वागत केले. विजयादशमीच्याच दिवशी नागपूरामध्ये मोहिते वाड्यात १९२५ मध्ये संघाची स्थापना झाली होती. यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने सघोष पथ संचलनांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते.

या वेळेच्या संचलनाचे वैशिष्ठ्य सांगायचे तर शहरातील विविध वस्त्या (झोपडपट्टी) व छोट्या- मोठ्या सोसायट्यांमधून संचलन मार्गाचे प्रकारचे नियोजन करण्यात आले होते. तसेच विद्यापीठ नगराचा भाग असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा प्रथमच सघोष संचलन काढण्यात आले. त्यात विद्यार्थी स्वयंसेवक लक्षणीय संख्येने सहभागी झाले. दरम्यान काही ठिकाणी संचलनासमवेत शस्त्र पूजन उत्सवांचे आयोजन देखील करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे संचलन वस्तीतून विविध मार्गस्थ होताना सर्व स्तरातील नागरिकांनी भव्य असे स्वागत केले. यावरून समाजात संघाविषयी स्वीकारार्हता वाढल्याचे दिसून येते आहे.

विजयादशमी निमित्ताने विविध नगरांमध्ये सकाळी ७.३० वाजता सघोष संचलनांचे आयोजन करण्यात आले होते. संचलनाच्या मार्गावरून नागरिकांनी आकर्षक रांगोळी आणि विविध फुलांच्या व पाकळ्यांच्या सड्यांनी भरून गेलेले दिसत होते. दरम्यान संचलनातील स्वयंसेवकांवर व भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे विविध नगरांमध्ये सर्व विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील संचलनाचे स्वागत केले. तर पुणे महानगराच्या विविध नगरांमध्ये प्रतिष्ठित व मान्यवर नागरिकांनी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित राहून संचलनाची पाहणी केली.

प्रथेप्रमाणे सकाळी रा.स्व. संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण घोषातर्फे शिवाजीनगर भागातील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सघोष मानवंदना देण्यात आली. यावेळी व केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार विभागाचे राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व कसबा भागाचे संघचालक अॅड. प्रशांत यादव यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्याआधी पुणे महानगर संघचालक श्री. वंजारवाडकर व कसबा भागाचे संघचालक प्रशांत यादव यांच्या हस्ते मोतीबाग कार्यालयात शंख व भगव्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

संघ कामात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. अनेक तरूणांनी संघ कार्यात सहभाग वाढवित व संचलनात संपूर्ण गणवेशात सहभागी झालेले दिसून आले. तरूणांसोबत अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक देखील गणवेशासह संचलनात सहभाग नोंदविला.
..
चौकट
..
शस्त्र पूजन उत्सवात तरूणांचा सहभाग अधिक
विजयादशमीपूर्वी पुणे शहरामधे एकूण ३७ ठिकाणी तरूण विभागाचे शस्‍त्रपूजन उत्‍सव झाले तसेच ४० ठिकाणी बाल विभागाचे शस्‍त्रपूजन उत्‍सव झाले. या उत्‍सवांना देखील ७००० पेक्षा अधिक तरूण आणि ३००० पेक्षा अधिक बाल उपस्थित होते.
..
फोटोओळ –
१. महानगरातील विविध ठिकाणच्या संचलनापूर्वी एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना (डावीकडून) अॅड. यादव, केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, खासदार मेधा कुलकर्णी, दिलीप उंबरकर व महानगर कार्यवाह सचिन भोसले.
२. पुणे महानगराच्या विविध भागात रा. स्व. संघ स्वयंसेवकांकडून पूर्ण गणवेषात सघोष व शिस्तबद्ध संचलने काढण्यात आली.
..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments