Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा शौरेन सोमण याला दुहेरी मुकुट; ...

पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा शौरेन सोमण याला दुहेरी मुकुट; ऋग्वेद दांडेकर याला उपविजेतेपद

सांगली दिनांक १४ ऑक्टोबर २०२४
पुण्याच्या शौरेन सोमण याने १५ व १७ वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले आणि पाचव्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविला. मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात पुण्याचा ऋग्वेद दांडेकर याला उपविजेतेपद मिळाले.

नवकृष्णा व्हॅली स्कूल, कुपवाड एमआयडीसी, सांगली येथे सूरज फाउंडेशन सांगली यांच्यातर्फे आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात सोमण या पाचव्या मानांकित खेळाडूने ठाण्याचा सहावा मानांकित खेळाडू प्रतिक तुलसानी याचे आव्हान ९-११,११-६,११-५,११-८ असे मोडून काढले. पहिली गेम गमावल्यानंतर त्याने टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ करीत हा सामना जिंकला. पाठोपाठ त्याने सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात पुण्याचाच खेळाडू ईशान खांडेकर याला पराभूत केले. नवव्या मानांकित सोमण याने द्वितीय मानांकित खांडेकर याला १४-१२,११-५,११-९ असे पराभूत करताना अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला. सोमण हा पुण्याच्या एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याने आजपर्यंत जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात पुण्याचा खेळाडू ऋग्वेद दांडेकर याला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले मुंबई महानगर जिल्हा संघाचा खेळाडू यश कोल्हे याने त्याला ७-११,११-६,११-५, ११-८ असे पराभूत केले. मुलांच्या तेरा वर्षाखालील गटात सातवा मानांकित प्रतिक तुलसानी या ठाण्याच्या खेळाडूने अग्रमानांकित आरव होरा याच्यावर ११-८,११-५,११-४ असा सनसनाटी विजय नोंदवित अजिंक्यपद मिळविले.

मुलींच्या अकरा वर्षाखालील गटात ठाण्याची द्वितीय मानांकित खेळाडू जिनया वधान हिने नाशिकची अग्रमानांकित खेळाडू केशिका पूरकर हिच्यावर १३-११,११-४,११-६ अशी अनपेक्षित मात करीत विजेतेपदावर नाव कोरले तर १३ वर्षाखालील गटात मुंबईच्या टी एस टी संघाची अग्रमानांकित खेळाडू मायरा सांगळेकर विजेती ठरली. तिने अंतिम सामन्यात आपली सहकारी पलक झंवर हिच्यावर ११-१३,११-२,११-३,११-९ असा विजय मिळविला. मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटात ठाण्याची तृतीय मानांकित खेळाडू सान्वी पुराणिक हिने अंतिम सामन्यात आपली सहकारी स्वरा जांगडे हिच्यावर ४-११,११-६,११-९,११-५ असा विजय मिळविला. मुलींच्या सतरा वर्षाखालील गटात ठाण्याच्या रितिका माथूर या अग्रमानांकित खेळाडूने आपली सहकारी अन्वी थोरात या तृतीय मानांकित खेळाडूचा ९-११,६-११,११-८,११-६,११-८ असा पराभव करीत विजेतेपद मिळविले.

मुलांच्या १९ वर्षाखालील गटात मुंबईच्या टीएसटी संघाचा तृतीय मानांकित खेळाडू ध्रुव शहा याने मुंबई महानगर जिल्हा संघाचा आठवा मानांकित खेळाडू पार्थ मगर याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. त्याने अटीतटीच्या लढतीनंतर ११-७,११-३,११-१३,११-१३, ११-४,११-९ असा विजय मिळविला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी अतिशय बहारदार खेळ करीत प्रेक्षकांना खेळाचा आनंद मिळवून दिला. उपांत्य फेरीत ध्रुव याने पुण्याचा द्वितीय मानांकित खेळाडू नील मुळ्ये याच्यावर ११-८,११-९,११-९ असा सहज विजय मिळविला होता तर पार्थ याने आपला सहकारी सिद्धांत देशपांडे या चौथ्या मानांकित खेळाडूवर ११-३,१२-१४,११-४,११-८ अशी अनपेक्षित मात केली होती.

मुलींच्या १९ वर्षाखालील गटात अंतिम सामन्यात मुंबईच्या टीएसटी संघाचा अनन्या चांदे हिने आपलीच सहकारी श्रावणी लोके या तृतीय मानांकित खेळाडूवर मात करीत आपले अग्रमानांकन साथ ठरविले. हा सामना तिने ११-२,११-५,११-७,११-९ असा जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. उपांत्य फेरीत तिने ठाण्याची पाचवी मानांकित खेळाडू रितिका माथूर हिचे आव्हान ११-८,११-८,१२-१० असे संपुष्टात आणले होते तर श्रावणी हिने ठाण्याची खेळाडू ऋतुजा चिंचासुरे या दहाव्या मानांकित खेळाडूला ७-११, १३-११,११-८, ११-७ असे पराभूत केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments