Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedजयपूर लिटरेचर फेस्टिवल २०२४मध्ये उलगडला जाणार हवामान व पर्यावरणविषयक संभाषणांचा समृद्ध पट

जयपूर लिटरेचर फेस्टिवल २०२४मध्ये उलगडला जाणार हवामान व पर्यावरणविषयक संभाषणांचा समृद्ध पट

संस्कृतींना आकार देणारे हवामान बदल, जीवाश्म इंधनाच्या युगातून होणारे स्थित्यंतर, वाघांच्या गूढरम्य कथा, हवामान व पर्यावरण ह्यांसंदर्भातील आव्हाने आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेली एआयची जोड ह्यांबद्दलच्या कथा तसेच वेगवेगळ्या काळात झालेली मानवी स्थलांतरे व पिके आणि अशा अनेक विषयांवर लक्ष केंद्रित करणारी सत्रे महोत्सवात होणार आहेत.

हवामान व पर्यावरणाच्या समस्यांवर विचारप्रवर्तक चर्चा घडवून आणण्यासाठी जयपूर लिटरेचर फेस्टिवलचे सतरावे पर्व सज्ज होत आहे. १ ते ५ फेब्रुवारी ह्या काळात जयपूरमधील हॉटेल क्लार्क्स अमेरमध्ये होणाऱ्या ह्या महोत्सवात साहित्यिक, विचारवंत व मानवतावादी ह्यांचा अनन्यसाधारण संयोग नक्कीच बघायला मिळणार आहे.

द अर्थ ट्रान्सफॉर्म्ड: अॅन अनटोल्ड स्टोरी

वक्ते: पीटर फ्रँकोपॅन आणि युवान अॅव्हेस

इतिहासकार आणि लेखक पीटर फ्रँकोपॅन ह्यांनी द अर्थ ट्रान्सफॉर्म्ड: अॅन अनटोल्ड स्टोरी ह्या आपल्या नवीन पुस्तकाद्वारे क्रांतिकारी नवीन इतिहास मांडला आहे. हवामान बदलांनी सर्व काळांमध्ये विकासाच्या प्रक्रियांना आणि संस्कृतींच्या लयांना कसा नाट्यमयरित्या आकार दिला हे ह्या पुस्तकामध्ये उलगडण्यात आले आहे. ह्या पुस्तकाची व्याप्ती अनेक शतकांमध्ये व खंडांमध्ये पसरलेली आहे. इतिहास घडवण्यात निसर्गाने नेहमीच कशी पायभूत भूमिका बजावली आहे हे फ्रँकोपॅन त्यांच्या भाषणात स्पष्ट करून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वीमातेच्या लहरींमुळे संस्कृती कशा लयाला गेल्या ह्याचेही मूल्यमापन करणार आहेत. युवान अॅव्हेस फ्रँकोपॅन ह्यांच्याशी संवाद साधतील.

इंटरटायडल: अ कोस्ट अँड मार्श डायरी

वक्ते: युवान अॅव्हेस, रॉबर्ट मॅकफार्लेन आणि कोलिन थुब्रॉन

लेखक व निसर्गवादी युवान अॅव्हेस ह्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या इंटरटायडल: अ कोस्ट अँड मार्श डायरी हे पुस्तक म्हणझे दोन वर्षे व तीन पावसाळ्यांमध्ये घडणारी गोष्ट आहे. किनारपट्टी, पाणथळ जागा, हवामान आणि स्वत:बद्दलच्या सखोल निरीक्षणांची ही नोंद आहे. जमीन समुद्राला मिळते त्या प्रदेशांतील तसेच माणसाचे अस्तित्व जगात मिसळते त्या भागांतील दरम्यानच्या जागांमध्ये खोलवर जाणारे हे पुस्तक सौंदर्य व कमकुवतपणाच्या पार्श्वभूमीवरील सूक्ष्मात सूक्ष्म सजिवांच्या आंतरक्रियांचा वेध घेते. प्रख्यात लेखक रॉबर्ट मॅकफार्लेन व प्रसिद्ध प्रवासवर्णनपर लेखक तसेच कादंबरीकार कोलिन थुब्रॉन ह्यांच्याशी होणाऱ्या संभाषणाच्या माध्यमातून अॅव्हेस आपल्याला मनुष्य, समुद्र व किनारपट्टी ह्या द्वैताच्या पलीकडे असलेल्या सौहार्दपूर्ण सहअस्तित्वाच्या जगात घेऊन जाणार आहेत.

सीओपी२८: ग्लोबल स्टॉक टेक

वक्ते: हर्व डेल्फिन, फिलिप ग्रीन, मे-एलिन स्टेनर, जेफ गुडेल आणि श्याम सरन

जीवाश्म इंधनाच्या युगाच्या ‘अंताच्या सुरुवातीचा’ इशारा देणाऱ्या एका कराराने सीओपी२८ची सांगता झाली. हे स्थित्यंतर वेळेत तसेच न्याय्य पद्धतीने होण्यासाठी संभाव्य मार्गांवर एक माहितीपूर्ण चर्चासत्र घेतले जाणार आहे. धोरणांच्या पलीकडे जाऊन ठोस निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी जागतिक स्तरावर एकी व निर्धार दाखवला जाण्याच्या आवश्यकतेवरही ह्यात भाष्य केले जाणार आहे.

हूफप्रिण्ट्स: इयर ऑफ द कॅमल

वक्ते: इल्से कोहलर-रॉलेफ्सन आणि युवान अॅव्हेस

२०२४ हे ‘इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमलिड्स’ म्हणून जाहीर करण्यात आले असून, विरोधी परिसंस्थांचे संरक्षण करण्यात तसेच जगभरातील कोट्यवधी कुटुंबांना रोजगार मिळवून देण्यात कॅमलिड्स अर्थातच उंटवर्गीय प्राणी बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची ह्याद्वारे दखल घेतली जात आहे. शास्त्रज्ञ इल्से कोहलर-रॉलेफसन ह्यांनी कॅमल कर्मा हे पुस्तक लिहिले आहे. इल्से ह्यांनी राजस्थानातील उंट वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही कथा आहे. त्याचप्रमाणे राइका समाजातील लोक आणि त्यांचे ह्या प्रजातींसोबत असलेले दीर्घकालीन नाते ह्यांबद्दलची माहितीही देण्यात आली आहे. इल्से ह्यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले हूफप्रिण्ट्स ऑन द लॅण्ड हे पुस्तकही, माणसे व प्राणी ह्यांच्यातील कार्यात्मक सहयोगाचे, वर्णन रोचक व काव्यात्म भाषेत करते. निसर्ग आणि मनाचा संयोग होतो अशा प्रदेशांत युवान अॅव्हेस लिहितात, शिकवतात, शिकतात व जगतात. ते अनेक पुरस्कार प्राप्त केलेले लेखक, निसर्ग-शिक्षक व पर्यावरणाचे पाठीराखे आहेत. तसेच निसर्ग शिक्षण व संशोधनासाठी स्थापन करण्यात आलेल्या पल्लुयिर ट्रस्टचे ते व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. कोहलर-रॉलेफ्सन आणि अॅव्हेस हे दोघे मिळून, जगभरातील उंट संस्कृतींवर, ह्या प्राण्यांच्या कल्याणावर व संवर्धनावर तसेच अन्नसुरक्षा, हवामानबदल व जैवविविधता ह्या समस्या सोडवण्यातील त्यांच्या निर्णायक योगदानावर, चर्चा करणार आहेत.

ऑफ बिग कॅट्स अँड टायगर्स

वक्ते: गार्गी रावत आणि अरेफा तेहसीन

जंगलाच्या परिसंस्थेतील बंगाल टायगरसारखे विशाल वाघ, लेखकांच्या अनेक पिढ्यांना फिक्शन तसेच नॉन-फिक्शन लिहिण्यास प्रेरणा देत आले आहेत. वृत्त समालोचक आणि पर्यावरणविषयक वार्ताहर गार्गी रावत ह्यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले टायगर सीझन हे पुस्तक म्हणजे एका पर्यावरण पत्रकाराच्या वाघासोबत झालेल्या संवादाची, प्रेमाची व निसर्गाची काल्पनिक कथा आहे. लेखक, कादंबरीकार आणि निसर्गवादी कार्यकर्त्या अरेफा तेहसीन ह्यांची राजस्थान सरकारने उदयपूर जिल्ह्यातील मानद वन्यजीव प्रबंधक म्हणून नियुक्ती केली होती. तेहसीन ह्यांनी त्यांची पुस्तके व लेखांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा विषय नेहमीच लावून धरला आहे. गार्गी आणि अरेफा ह्या दोघी मिळून वाघांच्या गूढरम्य गोष्टींवर तसेच राजस्थानातील संवर्धनाच्या प्रयत्नांवर चर्चा करणार आहेत.

द सेक्रेड ट्रीज ऑफ इंडिया

वक्ते: लुई फॉवलर-स्मिथ, प्रदीप कृष्णन व मृदुला रमेश

लुई फॉवलर-स्मिथ ह्यांच्या सेक्रेड ट्रीज ऑफ इंडिया ह्या अलीकडचे प्रकाशित झालेल्या पुस्तकात जंगलतोडीमुळे पर्यावरणाच्या शाश्वततेला निर्माण झालेला मूलभूत धोका तसेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे सातत्य ह्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. भारतात प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये १० वर्षे केलेल्या कामाच्या आधारे फॉवलर-स्मिथ ह्यांनी भारतातील पवित्र झाडे व देवरायांचे कौशल्याने दस्तावेजीकरण केले आहे. त्याचप्रमाणे निसर्गाकडे वस्तूसारखे बघण्याच्या पाश्चिमात्य भांडवलशाही दृष्टिकोनाला प्रभावी पर्याय पुरवणाऱ्या वृक्षआराधनेसारख्या परंपरांची दखलही ह्यात घेतली आहे. पर्यावरणवादी व चित्रपटकर्ते (फिल्ममेकर) प्रदीप कृष्णन ह्यांच्या जंगल ट्रीज ह्या पुस्तकात ह्या प्रदेशात आढळणाऱ्या झाडांचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. मृदुला रमेश ह्यांच्याशी होणाऱ्या संवादादरम्यान हे दोघेही, पर्यावरणाचा विध्वंस रोखू बघणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनाच्या संस्कृतीच्या अनेक पदरांवर, चर्चा करणार आहेत.

एआय फॉर गुड: द क्लायमेट चेंज

वक्ते: मार्कस दु सौतो आणि डेव्हिड सॅण्डालो

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स ह्या विषयांमुळे अनेक क्षेत्रांतील आपले आकलन आणि ज्ञानाचे उपयोजन पार बदलून गेले आहे. पर्यावरण व हवामानविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी एआयची मदत मिळाल्यामुळे, पृथ्वीवरील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच परवडण्याजोग्या पर्यावरणपूरक ऊर्जापर्यायांचा वापरासाठी अनेक मूलगामी संधी निर्माण होत आहेत. हवामान बदलाची समस्या हाताळण्यासाठी एआय वापरण्याच्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांचा सर्वसमावेशक विचार ह्या सत्रामध्ये केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी अन्य वैज्ञानिक प्रश्नांवरही चर्चा केली जाणार आहे.

द पेल ब्लू डॉट: चेरिशिंग अवर प्लॅनेट

वक्ते: मुकेश बन्सल, अमिताभ कांत, नीलकांत मिश्रा आणि विष्णू सोम

विश्वातील आपला ग्रह (पृथ्वी) आणि आपले स्थान जतन करण्याच्या समर्पक विषयावर अमिताभ कांत, मुकेश बन्सल आणि नीलकांत मिश्रा ह्या सत्रात चर्चा करणार आहेत. आपल्या आकाशगंगेचा व त्यापलीकडील शोध घेण्याच्या दृष्टीने भारताने मोठी झेप घेतली असताना, एक सजीव म्हणून आपला दृष्टीकोन विस्तारतो तसेच कक्षा व्यापक होतात. ‘वन वर्ल्ड’ ह्या संकल्पनेचे भान येत असले तरी हाव आणि गर्वामुळे जगामध्ये फूट पडते. उद्योजक, लेखक, तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आणि भविष्याताली अवकाश संशोधक, ह्या सत्राद्वारे, विस्तारणाऱ्या अवकाश परिसंस्थेतील जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकर्षक संभाव्यतेचा, वेध घेणार आहेत. ‘फ्युचर नाऊ’ हे विचारांना उत्तेजन देणारे तसेच द्रष्टे सत्र आपल्या बदलत्या जगाचा आढावा घेत आहे.

स्कॉर्च्ड अर्थ: लेसन्स फ्रॉम नेचर

वक्ते: सिद्धार्थ श्रीकांत, पीटर फ्रँकोपॅन, जेफ गुडेल आणि गार्गी रावत

हवामानातील बदल म्हणजे प्रामुख्याने तापमानात होत असलेली वाढ असे अनेकांना वाटते पण तापमानातील वाढ ही हवामान बदलांची केवळ सुरुवात आहे. कारण, पृथ्वी ही एक प्रणाली आहे. ह्या प्रणालीत सर्व काही परस्परांशी जोडलेले आहे. ह्यात किंचितसा बदल झाला, तरी त्याचा परिणाम अन्य अंगांवर होतो. इतिहास व वर्तमान राजकारणाच्या माध्यमातून वाट काढत आपले तज्ज्ञमंडळ भूतकाळाने शिकवलेल्या धड्यांचे मूल्यमापन करणार आहे, जेणेकरून, हवामान बदलाचा वर्तमानावर व भविष्यावर होणारा परिणाम अधिक चांगल्या रितीने समजून घेतला जाऊ शकेल.

चेसिंग सस्टेनॅबिलिटी: पॉलिसी, इंडस्ट्री अँड द एन्व्हॉर्न्मेंट

वक्ते: मृदुला रमेश, अमिताभ कांत व सुमंत सिन्हा आणि सिद्धार्थ श्रीकांत

आपल्या पृथ्वीमध्ये तीव्र स्वरूपाचे बदल घडत आहेत. महासागराची पातळी वाढत आहे, तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे हवामान बदलाने उभी केलेली आव्हाने मोडून काढण्यासाठी जगभरातील सरकारे व उद्योगांनी मूलभूत पावले उचलली आहेत. अधिक शाश्वत, न्याय्य आणि हवामान बदलाच्या दृष्टीने स्थितीस्थापक अशा जागतिक अर्थव्यवस्थेच्या दिशेने स्थित्यंतर करणारे नेतृत्व, उपाय व महत्त्वाकांक्षी कृती ह्यांचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती ह्या सत्रात सहभागी होणार आहेत.

 

मायग्रण्ट्स: इंटरकनेक्शन्स अक्रॉस टाइम

वक्ते: सॅम मिलर, सुरेशकुमार मुथुकुमारन आणि आरती प्रसाद

मानव हा मुळातच स्थलांतर करणारा प्राणी आहे. अन्य कोणत्याही जमिनीवरील सस्तन प्राण्याच्या तुलनेत मानव अधिक स्थलांतर करतो. तरीही स्थलांतर हा आपल्या काळात अत्यंत द्वेषपूर्ण वादाचा विषय झाला आहे. ह्या अनन्यसाधारण सत्रामध्ये, मानव व पिकांच्या सर्व काळांमध्ये झालेल्या स्थलांतरांबाबतची निरीक्षणे एकत्र मांडली जातील आणि त्या योगे जग आतून कसे जोडलेले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मायग्रण्ट्स: द स्टोरी ऑफ अस ऑल ह्या सॅम मिलर ह्यांच्या अलीकडील पुस्तकात मानव प्रजातीचा भटका दृष्टिकोन मांडण्यासाठी व्यक्तिगत व परिस्थितीचे स्तर परस्परांना जोडण्यात आले आहेत. इतिहासकार आणि लेखक सुरेशकुमार मुथुकुमारन ह्यांच्या ट्रॉपिकल टर्न ह्या पुस्तकात प्राचीन मध्यपूर्व व भूमध्यसागरी प्रदेशातील विषुववृत्तीय आशियाई पिकांचा अगदी सुरुवातीचा इतिहास मांडण्यात आला आहे. ह्यात तांदूळ व कपाशीपासून लिंबूवर्गीय फळे व काकडीपर्यंतच्या पिकांचा समावेश आहे. लेखक आरती प्रसाद ह्यांच्याशी संवादाच्या माध्यमातून हे दोघे जगभरातील स्थलांतरांच्या विस्मयकारी मार्गांचा वेध घेतील. ह्या स्थलांतरांमधून आधुनिक जगातील अनन्यसाधारण व्यामिश्र पर्यावरणीय, सांस्कृतिक व सामाजिक पट कसा निर्माण झाला ह्यावरही ते चर्चा करतील.

विशेष आतिथ्यासह अनन्यसाधारण अनुभव देणारे ‘फ्रेण्ड ऑफ द फेस्टिवल’ पॅकेज बुक करण्यासाठी ह्या लिंकवर जा: https://jaipurliteraturefestival.org/friendsofthefestival-registration.

माध्यमांसाठी नोंदणी आता खुली झाली आहे, तुम्ही खालील लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता:

https://jaipurliteraturefestival.org/media-registration#/registration

महोत्सवाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: https://jaipurliteraturefestival.org/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments