Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिंचवड विधानसभा मतदार संघात नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण* *निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे...

*चिंचवड विधानसभा मतदार संघात नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण* *निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी- अनिल पवार*

पुणे, दि. २६: लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी
सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय भावनेने तसेच समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या थेरगाव येथे आयोजित प्रशिक्षणा वर्गात ते बोलत होते.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे, सेक्टर ऑफिसर समन्वयक अजिंक्य येळे, पोस्टल बॅलेट समन्वय अधिकारी अमित पंडित यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पवार म्हणाले, मतदान केद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रीयेसंबंधी असणाऱ्या शंकांचे प्रशिक्षणामुळे निरसन होते. मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या आवश्यक सूचनांची अंमलबजावणी करावी. तसेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर करावी. प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी उद्या रविवार २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रशिक्षणास उपस्थित रहावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची माहिती तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य कसे पार पाडावे याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. निवडणूक विषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी मतदारांसाठी टपाली मतदान, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र तपासणी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ओळख, कंट्रोल युनिट, बॅलट युनिट, व्ही व्ही पॅट चे कार्य, मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची उभारणी, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यावर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रांची जोडणी, मॉक पोल (अभिरूप मतदान), मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही आदीबाबत माहिती दिली. यावेळी मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सांगून मतदान केंद्राध्यक्षांच्या मतदान केंद्र परीसरातील जबाबदाऱ्या, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही आदी बाबींची माहिती दिली.

प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले. प्रथम सत्रात थेरगाव येथील स्व.शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवनात संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. तर द्वितीय सत्रात थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments