*
पुणे, दि. २६ : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण खेड येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये संपन्न झाले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती देवरे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार डी.पी. माळी, मदन जोगदंड, राम बिजे आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्याचे कामकाज काटेकोरपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून जबाबदारीने आपले कर्तव्य चोख बजवावे, असे निर्देश खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिले.
निवडणूक कामकाज जबाबदारीचे आणि संवेदनशील असते. याचे गांभिर्य लक्षात घेवून यातील सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना श्री. दौंडे यांनी यावेळी दिल्या.
खेड – आळंदी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २ हजार ४८५ मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या पैकी १ हजार २३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाच्या आवश्यक प्रक्रियांची आणि त्यासाठी असलेल्या भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली.
मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी यांचे कामकाज आणि जबाबदाऱ्या यावेळी सांगण्यात आल्या. विधानसभा निवडणूक २०२४ मधील महत्वाचे बदल, मतदानादरम्यान विविध नमुनापत्रात भरावयाच्या माहितीचे विवरण आदी विविध मुद्यांवर प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली.
यानंतर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. मतदान अधिकारी व् कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण ९ व १० नोव्हेंबर २०२४ रोजी होईल, असे श्री अनिल दौंडे यांनी यावेळी सांगितले.


