चित्रपट अभ्यासक शशीकांत किणीकर यांचे निधन

तारां कित Avatar

पुणे, दि. ६ : ज्येष्ठ भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचे अभ्यासक शशीकांत किणीकर यांचे वृद्धापकाळाने नुकतेच (३० ऑक्टोबर) निधन झाले.ते 83 वर्षांचे होते. मृत्यूसमयी ते अमेरिकेतील मुलाच्या घरी वास्तव्याला होते . त्यांच्या पश्चात पत्नी शरदिनी, पुत्र ओंकार, स्नुषा स्वाती आणि नातवंडे असा परीवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट अभ्यासकांच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्ती आणि घटनांमधील बारकाव्यांचा शोध घेणाऱ्या किणीकरांनी अशा अनेक गोष्टींचे दस्तावेजीकरण करत चित्रपटावरील व्यापक लेखन मराठी तसेच इंग्रजीमधून केले.

1970 च्या दशकात भोसरी येथील फिलिप्स कंपनीत अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून काम करणाऱ्या किणीकरांचे भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रेम व अभ्यास तेव्हापासूनचा आहे. आपली नोकरी सांभाळून त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांच्या मुलाखती, त्यावर आधारीत चित्रपटाच्या इतिहासाच्या पाऊलखुणांचा सातत्याने वेध घेतला. किणीकर यांच्या मते पूर्ण लांबीच्या भारतीय चित्रपटाची सुरूवात 1913च्या आधी (दादासाहेब फाळके यांच्या ‌‘राजा हरीश्चंद्र‌’च्याही आधी) म्हणजे 1912 मध्ये दादासाहेब तोरणे यांच्या ‌‘पुंडलीक‌’ या चित्रपटाने झाली; तर पहिला मराठी चित्रपट ‌‘तुकाराम उर्फ जय हरी विठ्ठल‌’ असून तो 31 जानेवारी 1932 रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपटही तेव्हा गाजलेल्या ‌‘आयोध्येचा राजा‌’ या चित्रपटापूर्वी केवळ आठ दिवस चित्रपटगृहांमध्ये लागला होता. किणीकरांच्या संशोधनानुसार पहिला गाणी नसलेला मराठी चित्रपट ‌‘ठकीचे लग्न‌’ असून तो 1935 मध्ये प्रदर्शित झाला.

किणीकरांनी भारतीय चित्रपटातील गाजलेली व्यक्तिमत्त्व गुरूदत्त, मीनाकुमारी, संगीतकार नौशाद, जयराज, मधूबाला इत्यादींवर पुस्तकरूपाने विपुल लेखन केले होते. अखेरपर्यंत त्यांचे लेखन चालू होते.

Tagged in :

तारां कित Avatar