Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक मधुमेह दिन आपण काय खातो हे गांभीर्याने विचार करण्याची वेळ :...

जागतिक मधुमेह दिन आपण काय खातो हे गांभीर्याने विचार करण्याची वेळ : डॉ.पाटणकर

पुणे,13 नोव्हेंबर 2024 : नियमित व्यायाम,शरीराची हालचाल यासह आपण काय खातो याकडे गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. बेताल खाणे,चुकीची जीवनशैली,त्यातून निर्माण होणारी स्थुलता आणि परिणामी उद्भवणारे विविध आजार हा एक चिंतेचा विषय आहे,असे मत प्रख्यात मूत्ररोगतज्ञ आणि एस हॉस्पिटल,एरंडवणे चे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले.

14 नोव्हेंबर या जागतिक मधुमेह दिवसाच्या निमित्ताने जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षीची संकल्पना ब्रेकिंग बॅरिअर्स,ब्रिजिंग गॅप्स ही आहे. जागरुकता कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य मधुमेहाचा धोका कमी करणे आणि ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांनी नियमित औषधोपचार आणि चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करावा याचा प्रचार करणे आहे.

डॉ.पाटणकर पुढे म्हणाले की,भारत ही मधुमेहाची राजधानी बनत आहे,हे आता सर्वांना माहित झाले आहे.मधुमेहाबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता देखील झाली आहे.असे असले तरी आपण काय खातो,आपली जीवनशैली बरोबर आहे का? याबाबत अजूनही गांभीर्याने विचार आपण करत नाही.म्हणूनच कमी वयात वजन वाढणे,पोटाचा घेर वाढणे,मधुमेह आणि कालांतराने त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत देखील कमी वयात दिसून येत आहे. मुतखड्यांसह मुत्रपिंडाचे विकार,लैंगिक समस्या हे या गुंतागुंतीची काही प्रमुख उदाहरणे आहेत. टाईप 1 मधुमेहाबाबत नियमित औषधोपचार महत्त्वाचे असतात. पण टाईप 2 चा धोका आपण नक्कीच कमी करू शकतो.वाढलेले वजन,लठ्ठपणा,मधुमेह हे एक दुष्टचक्र निर्माण झाले आहे.ते वेळीच ओळखून रोखणे गरजेचे आहे. समस्या ही आहे की, आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थ आणि घरच्या अन्नापासून आपण दूर जाऊन तळलेेले किंवा पॅकेज्ड फूडस्‌‍ना पसंती देत आहोत. त्याचप्रमाणे वजन वाढल्यावर क्रॅश डाएट,फॅड डाएट याकडे लोकांचा कल असतो. त्याशिवाय ही फॅड डाएटस्‌‍ जास्त दिवस नियमितपणे घेणे खूप अवघड असते आणि मग वाढलेले वजन कमी करणे आणखी कठिण जाते. म्हणूनच पारंपरिक आणि घरच्या अन्नाचे सेवन हे चांगल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक आहे,हे समजणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले की,आशियाई लोकांमध्ये ट्रंकल फॅट म्हणजे पोटाच्या घेराचे प्रमाण हे जास्त असतेे. शरीरात इतरत्र चरबी साठण्यापेक्षा आपल्या येथे पोटाचा घेर दिसून येतो. याशिवाय यकृत आणि हाडांच्या स्नायूंच्या भोवती चरबी साठायला लागते,परिणामी इन्शुलिन प्रतिकार वाढतो आणि चयापचयाच्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच वजन आणि पोटाचा घेर याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. चवीसाठी काही वेळा आणि नियंत्रित प्रमाणात बाहेरचे अन्न पदार्थ सेवन करणे ठीक आहे,पण याची वारंवारता वाढल्यास समस्या उद्भवतात. खरंतरं मधुमेह आणि विशेष करून टाईप 2 हा आजारापेक्षा जीवनशैलीचा विकार आहे आणि त्याला दूर ठेवणे शक्य आहे. गरज आहे ती,थोडीशी शिस्त बाळगण्याची.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments