*
पुणे, दि. १५: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यादृष्टीने मतदान जनजागृतीसाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी १८ नोव्हेंबर २०२४ पूर्वी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे, असे निर्देश सहकारी संस्थांचे पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिले आहेत.
या सभेप्रसंगी मतदान टक्केवारीत वाढीच्या दृष्टीने विविध विषय मांडण्यात यावेत. यामध्ये ग्रामीण संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत सर्व गृहनिर्माण संस्थामध्ये मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्याचे काम सुरू असून या चिठ्ठीचे वाटप प्रत्येक सभासदापर्यंत होणे आवश्यक आहे. याबाबतही संस्था पदाधिकाऱ्यांनी खात्री घ्यावी. ज्या ठिकाणी मतदार ओळख चिठ्ठी अद्यापही पोहोचल्या नाहीत, अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बी.एल.ओ.) सुलभरित्या करण्याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात.
मतदान जनजागृतीकरीता सहकार विभागाचे कर्मचारी व प्रमाणित लेखापरीक्षक तसेच बी.एल.ओ यांना संपर्क साधून बी. एल.ओ. मार्फत मतदार चिठ्ठीचे वितरण सुलभपणे होईल यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेतील मयत व स्थलांतरीत मतदारांबाबत बी.एल.ओ यांना माहिती देण्याबाबत सभासदांना सूचना देण्यात याव्यात.
मतदान जनजागृतीबाबत जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी तसेच चालू लेखापरीक्षक नामतालिकेतील प्रमाणित लेखापरीक्षकांना या कामकाजामध्ये सहभागी करुन त्यांना उद्दिष्ट द्यावे. मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाशी समन्वय ठेवण्याकरीता एका कर्मचाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.
सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मतदानास पात्र असलेल्या सभासदांची यादी तयार करुन त्यांना व्हॉटसॲप, ई-मेल, आदी मार्गाने मतदानासाठी प्रवृत्त करण्याबाबत संस्थांना सूचना देण्यात याव्यात. संस्थेतील सूचना फलकावर अथवा दर्शनी भागात जागृतीपर पोस्टर प्रसिद्ध करावे. त्यामध्ये मतदानाच्या दिनांकाचा उल्लेख करावा.
ऑनलाईन मतदान ओळखपत्र काढण्यासाठी तसेच मतदार यादीतील नाव शोधण्याकरीता संस्थेतील तंत्रज्ञानविषयक जाणकार व्यक्तींनी सभासदांना मदत करावी. मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान करुन आलेल्यांची मतदारांची नोंद घ्यावी. दुपारी 1 वाजता आढावा घेऊन ज्यांचे मतदान बाकी असेल त्यांच्याशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संपर्क करुन त्यांना मतदान करण्याबाबत आवाहन करावे. शक्य असल्यास वृद्ध व दिव्यांग यांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरीता वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत सहकार्य करावे.
गृहनिर्माण संस्थांनी मतदान केलेल्या सभासदांना पुष्प देऊन अभिनंदन करावे. मतदानाची वेळ संपल्यावर संस्थांनी एक विशेष सोहळा आयोजित करून प्रथमच मतदान केलेल्या युवक-युवतींना सन्मानित करावे व त्यांचे अभिनंदन करावे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीमध्ये सभासदांचा सक्रिय सहभाग व त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आवश्यक ती जनजागृती करण्यासाठी संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. जगताप यांनी केले आहे.
0000


