पुणे,25 नोव्हेंबर 2024 : सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) तर्फे लाँचपॅड 30 : स्वावलंबन स्कील टू एंटरप्राइज मॉडेल (स्टेम) या सर्टिफिकेशन आणि इनक्युबेशन प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले.या अनोख्या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी उद्योजक होऊ पाहणाऱ्या युवकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना यशस्वी उपक्रमांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये,मार्गदर्शन व साधने प्रदान करून समर्थन देणे आहे.हा कार्यक्रम एसएसपीयूच्या किवळे कॅम्पस येथे पार पडला.निवड झालेल्या 30 स्पर्धकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे परिवर्तनशील प्रवासाची सुरूवात आहे.
स्टेम कार्यक्रम हा केवळ एक प्रशिक्षण अभ्यासक्रम नसून महाराष्ट्रातील उद्योजकता परिसंस्थेला सक्रियपणे योगदान देण्याचे एसएसपीयूचे ध्येय आहे,यावर सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) च्या प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार यांनी भर दिला.विविध पार्श्वभूमी आणि वयोगटातील विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत उद्योजकतेची संस्कृती वाढविण्यासाठी एसएसपीयूच्या वचनबध्दतेबद्दल देखील त्यांनी सांगितले.
सीडबीचे सरव्यवस्थापक आणि प्रादेशिक प्रमुख अंजनी कुमार श्रीवास्तव यांनी 30 निवडक सहभागींचे अभिनंदन करून प्रेरणादायी भाषण केले.उद्योजकता विकसित करण्यासाठी एसएसपीयूच्या सक्रीय दृष्टीकोनाबद्दल त्यांनी प्रशंसा केली आणि आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे शाश्वत व्यवसाय निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांच्या महत्त्वावर भर दिला.श्रीवास्तव म्हणाले की, लाँचपॅड 30 उपक्रम हे महाराष्ट्रातील प्रतिभेला व अभिनवतेला चालना देण्यासाठी एक उत्तम पाऊल आहे.
यावेळी एसएसपीयूचे कुलगुरू डॉ.राजेश इंगळे उपस्थित होते.
लाँचपॅड 30 साठी निवडप्रक्रिया सर्वसमावेशक व कठोर होती.अर्जदारांनी आंत्रप्रेन्युअरशिप ॲक्युमेन डिटेक्शन टेस्ट (ईएडीटी) दिली आणि त्यानंतर त्यांच्यामधील उद्योजकीय क्षमता जाणून घेण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या.निवडलेले सहभागी तरूण विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीतून आले आहेत,त्यामध्ये नुकतेच पदवीधर झालेल्या तरूणांपासून सुरूवातीच्या टप्प्यात अनौपचारिक व्यवसाय असलेल्या व्यक्तींपर्यंत अशांचा समावेश आहे.त्यांचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असून या उपक्रमाची व्यापकता दर्शविते.
तीन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर वर्षभर इनक्युबेशन साहाय्य दिले जाईल,ज्याअंतर्गत सहभागींना साधने,नेटवर्किंग,संधी आणि तज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल.प्रशिक्षण,मार्गदर्शन आणि निधी या संयोजनाचे उद्दिष्ट सहभागींना यशस्वी,शाश्वत उद्योग उभारण्यासाठी सर्वोत्तम संभाव्य संधी देणे हे आहे.
लाँचपॅड 30 उपक्रमाअंर्तगत सहभागींना मोफत प्रशिक्षण प्रदान केले जाते.यामध्ये सहभागींसाठी जेवण आणि वसतिगृहात राहण्याची व्यवस्था आहे.याशिवाय या उपक्रमाद्वारे त्यांना व्यवहार्य व्यवसाय योजना विकसित करण्यात आणि उद्योजकतेच्या गुंतागुंतीमध्ये यशस्वीरित्या वाढ काढण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शन प्रदान केले जाते.या कार्यक्रमाद्वारे उदयास येणाऱ्या यशस्वी उपक्रमांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 30,000 रूपये बीजनिधी रक्कम दिली जाणार आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देणाऱ्या व्यावसायिक नेतृत्वाची नवीन पिढी तयार करण्यासाठी असलेला हा उपक्रम एसएसपीयूची उद्योजकता आणि नवोन्मेषाला चालना देण्याची वचनबध्दता प्रतिबिंबित करते.


