पुणे, १७ जानेवारी : अॅल्युमिनियमचे दरवाजे आणि खिडक्या तयार करणाऱ्या हैदराबादस्थित एनकोअर-अल्कॉम या कंपनीने गुजरातमधील सुरत येथे ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प स्थापन करत असल्याची घोषणा केली आहे. अॅल्युमिनियमचे दरवाजे आणि खिडक्या उत्पादन क्षेत्रातील हा देशातील पहिला ऑटो रोबोटिक प्रकल्प आहे. हा प्रकल्प १.८ लाख चौरस फूट क्षेत्रावर पसरला असून, अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाच्या साह्याने दररोज ३० हजार चौरस फूट दरवाजे आणि खिडक्या उत्पादन करण्याची याची क्षमता आहे.
“आमचा हा नवीन प्रकल्प क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वांत मोठा प्रकल्प असेल. यावर्षी मार्चपर्यंत हा प्रकल्प तयार होईल. येथे १८० लोकांना रोजगार मिळेल,” असे एनकोअर-अल्कॉमचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिवा कोटी रेड्डी म्हणाले.
रेड्डी पुढे म्हणाले, “आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार स्थापत्य उत्पादने तयार करतो. आमच्याकडे सुरतमध्ये आधीच ६० हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील प्रकल्प आहे. याची उत्पादन क्षमता प्रतिदिन दहा हजार चौरस फूट आहे. आमची उत्पादने या क्षेत्रातील अन्य स्पर्धकांच्या तुलनेत खूपच चांगली आहेत. सध्या ६० कंपन्या आमच्या ग्राहक आहेत.”
अल्कॉमचे संचालक जयंतीभाई मनुभाई म्हणाले, कंपनी १९ जानेवारीपासून हैदराबादमधील हायटेक्स येथे होणाऱ्या एसटेक ट्रेड फेअरमध्ये आपले नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पादने प्रदर्शित करेल.
कंपनी हैदराबादजवळील मोकिला येथेही २७ हजार चौरस फुट क्षेत्रावर फॅब्रिकेशन प्रकल्प उभारत असून, येथेही १८० लोकांसाठी रोजगार निर्माण होईल. येथे दहा हजार चौरस फुटांचे अनुभव केंद्रदेखील असेल. या वर्षी मार्चपर्यंत हा प्रकल्प सुरू होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
—


