पुणे,२९ नोव्हेंबर 2024 : एस हॉस्पिटल,पुणे येथील डॉक्टरांच्या टीमने नुकतेच मुत्रपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या 92 वर्षीय पुरूष रूग्णाच्या मुत्रपिंडातील गाठ (ट्युमर) काढून टाकण्यासाठी यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केली. 8 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या शस्त्रक्रियेचे नेतृत्व वरिष्ठ युरोलॉजिस्ट प्रा.डॉ.सुरेश पाटणकर यांनी केले. डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ.गुरुराज पडसलगी,डॉ.मयूर नारखेडे,डॉ.सचिन भुजबळ व सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश होता. रूग्णाला चौथ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.
या शस्त्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना एस हॉस्पिटल पुणेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुरेश पाटणकर म्हणाले की, एक महिन्यापूर्वी 92 वर्षांचा एक पुरूष रूग्ण आमच्याकडे आले होते,तेव्हा त्यांना पोटात तीव्र वेदना होत होत्या आणि लघवीतून रक्त येत होते. नियमित तपासणी,सीटी स्कॅन आणि पीईटी स्कॅन केल्यानंतर मुत्रपिंडाच्या कर्करोगातील गाठीचे (ट्युमर) निदान झाले. मुत्रपिंडाच्या आकाराच्या 2/3 इतका भाग ट्युमर ने व्यापला होता.यावेळी दुसऱ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे निदान झाले. हा ट्युमर रूग्णाच्या उजव्या मुत्रपिंडात होता.
अशा परिस्थितीत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रिया हे दोन पर्याय असतात. मात्र वैद्यकीय स्थिती आणि रूग्णाचे वय विचारात घेता रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा वयातील रूग्णावर शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते.मात्र कुशल टीम आणि रोबोटिक उपकरणांच्या उपलब्धतेमुळे ही प्रक्रिया शक्य झाली.
प्रा.डॉ.पाटणकर पुढे म्हणाले की, लॅप्रोस्कोपिक तंत्राच्या तुलनेत रोबोटिक शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. यामध्ये अचूकता,कमीत कमी छेद,अधिक सुस्पष्ट प्रतिमा,मशिनची अधिक कार्यक्षम हालचाल,कमीत कमी रक्तस्त्राव,रूग्णालयातील कमी मुक्काम, संसर्गाचा धोका कमी असणे आणि शल्यचिकित्सकांसाठी सुधारित कार्यपध्दती (एर्गोनॉमिक्स) यांचा समावेश आहे.
प्रा.डॉ.पाटणकर म्हणाले की,युरोलॉजीमधील अशा गुंतागुंतीच्या स्थिती एस हॉस्पिटलमधील आमच्या टीमकडून नियमितपणे कुशलतेने हाताळल्या जातात. अद्ययावत तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधांसह लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्याने कर्करोग बरा होऊ शकतो.