*
ध्वजदिन निधी दिन प्रत्येक वर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ज्यांनी आपल्या जीवनातील अनेक बहुमोल वर्ष मातृभूमीच्या सेवेत घालविली व आपल्या मातृभूमीची सेवा करीत असताना ज्यांनी स्वखुशीने मातृभूमीच्या संरक्षणासाठी प्राण अर्पण केले त्यांना मान वंदना देवून सैनिकाचे मनोबल वाढावे म्हणून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. ध्वजदिन निधी संकलन हा प्रामुख्याने संपूर्ण समाज वीर जवानांचा ऋणी असून त्यांच्यामागे उभा आहे, ही भावना व्यक्त करण्याकरीता, युध्दात धारातीर्थी पडलेल्या तसेच अपंगत्व आलेल्या जवानाच्या कुटुंबियाचे कल्याण व पुर्नवसन करण्याकरिता, त्यांच्यासाठी विविध योजना राबवून त्यांना मदत करण्याकरिता ही मुलभूत तत्वे जनमानसाच्या मनात रुजविण्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. त्या अनुषंगाने ध्वर्जादन निधी संकलन प्रत्येक वर्षी ०७ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येते आणि संकलित निधीचा उपयोग माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना तसेच सैनिकी मुलांचे, मुलींचे वसतिगृह करीता खर्च केला जातो.
*ध्वजदिन निधीची पार्श्वभूमी*
स्वातंत्र्यापूर्वी भारतात ११ नोव्हेंबर रोजी पॉपी डे साजरा करुन सैनिकांच्या कल्याणाकरिता निधी संकलित केला जात असे व संकलित निधीपैकी बहुतांश निधी इंग्लंडमधील माजी सैनिकांच्या कल्याणार्थ तर अल्पसा निधी भारतातील माजी सैनिकांच्या कल्याणार्थ वापरला जात असे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सैनिकांच्या कल्याणार्थ स्वतंत्रपणे नियोजन करण्याची बाब जेव्हा केंद्र शासनाकडे आली तेव्हा पावलो पावली पारतंत्र्याची आठवण करुन देणारा ११ नोव्हेंबर हा दिवस स्वतंत्र भारतातील सैनिकांना अभिवादन करण्यासाठी निश्चित करण्याऐवजी पर्यायी दिवस ठरविण्याचे निश्चित झाले. त्यास अनुसरुन दिनांक २८ ऑगस्ट १९४९ रोजी संरक्षणमंत्री, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याचा तसेच सर्व देशवासियांना झेंडे वाटून त्यांचेकडून सैनिकांच्या कल्याणाकरिता निधी संकलित करण्याचे निश्चित केले. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सैनिक बोर्ड व त्यांच्या देशभरातील स्थानिक कार्यालयाव्दारे दरवर्षी ७ डिसेंबरला सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांचे प्रतिक असलेले झेंडे वाटून पुढील वर्षभराच्या कालावधीत सैनिकांच्या कल्याणाकरिता निधी संकलित केला जाऊ लागला व या निधीला ध्वजदिन निधी म्हणून संबोधले जाऊ लागले. कालांतराने सन १९९३ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सैनिकांच्या कल्याणार्थ दिले जाणारे विविध निधी एकत्रित करुन त्याचे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी असे नामकरण करण्यात आले.
*ध्वजदिन निधी संकलन*
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाकरीता शासकीय यंत्रणेशिवाय स्वयंसेवी संस्था व सामान्य नागरिकांचाही मोलाचा वाटा असतो. यामध्ये प्रामुख्याने जनतेकडून स्वयंस्फुर्तीने निधी संकलित केला जात असून सदर निधी संकलनाकरीता डबा पद्धत वर्ज्य असून प्रत्येक ध्वजदिन निधी दात्यास शासकीय पावती देणे बंधनकारक असते.
*ध्वजदिन निधीचा विनियोग*
ध्वजदिन निधी संकलन कार्यातून एकत्रित झालेल्या निधीमधील अल्पसा अर्थात संबंधित राज्य, केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसंख्येस अनुसरुन दरडोई एक पैसा इतका निधी केंद्रिय सैनिक बोर्डाकडे वर्ग केला जातो तर उर्वरित निधी प्रादेशिक स्तरावर प्रामुख्याने युध्दात जखमी झालेल्या सैनिकांचे पुनर्वसन, सेवारत सेनिक व त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण व माजी सैनिक तथा त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण व पुनर्वसनसाठी खर्च केला जातो. याकरीता राष्ट्रीय स्तरावर संरक्षण मंत्री यांचे अध्यक्षतेखालील समिती तर प्रादेशिक स्तरावर संबंधित राज्याची प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असते.
महाराष्ट्र राज्यात संकलित झालेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधील ६० टक्के कल्याणकारी निधी मंत्री, माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीद्वारा निर्धारित धोरणानुसार सेवारत तथा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणार्थ राबविल्या जाणाऱ्या विविध ४६ योजनावर खर्च केला जातो. उर्वरित ४० टक्के विशेष निधी राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीद्वारा निर्धारित धोरणानुसार सैनिक मुला-मुलींची वसतिगृहे व सैनिक विश्रामगृहे निर्माण करण्यासाठी व ती कार्यान्वीत ठेवण्यासाठी वापरला जातो.
आपल्या देशाच्या तिन्ही सेना दलातील अनेक शूर जवानांनी मातृभूमी साठी स्वखुशीने प्राण अर्पण केले आहे. १९१९ पहिले महायुध्द, १९३९ ते १९४५ दुसरे महायुध्द, १९६२ व १९६५ चे चीनयुध्द आणि १९७१ ची भारत पाक लढाई, ऑपरेशन पवन, मेघदूत, ऑर्चिड-नागालैंड व कारगीलचे आपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम व अशाच आजपर्यंत झालेल्या विविध लढाईत चकमकीत १९ हजार पेक्षा जास्त जवानांनी आपल्या देशाच्या सुरक्षा व सन्मानासाठी स्वतःच्या प्राणाची आहूती दिल्यामुळे त्यांच्या संसाराची घडी विस्कटली गेली आहे. जे जवान शत्रुशी लढताना जखमी होवून अपंग झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर विपरीत परीणाम झाला आहे. खरोखरच त्या वीर जवानांनी त्यांचा आज आमच्या उद्यासाठी अर्पण केला. तसेच बांगलादेशाच्या स्वतंत्रता संग्रामामध्ये आपल्या सेनेचा अभूतपूर्व विजय आणि असा अविस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या आपल्या वीर सैनिकांची आठवण व १९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्याने केलेला सर्जीकल स्ट्राईक हि अत्यंत कौतुकास्पद कामगीरी मानली जाते. ध्वजदिन निधीस दिलेली देणगी आयकर कायदा १९६१ मधील कलम ८०G (५) (VI) अन्वये १०० टक्के आयकर मुक्त आहे.
*डॉ. सुहास दिवसे- जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय: सैनिक ही देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे. सैनिक आपल्या राष्ट्राचे रक्षक आहेत. प्रतिकूल परिस्थितही ते आपल्या राष्ट्राच्या सीमाचे रक्षण करतात. त्यामुळेचे आपण सर्वजण सुरक्षित आहोत. राष्ट्राच्या सुरक्षितेसाठी सैनिकांनी आपले कर्तव्य पार पाडतांना अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. ध्वजदिन साजरा करण्यामागील संकल्पना सामान्य जनतेला लहान ध्वजांचे वाटप करणे आणि त्या बदल्यात देणगी गोळा करणे ही आहे. देशासाठी लढणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांच्या कुटुंबियांची आणि आश्रितांची काळजी घेणे ही भारतातील नागरिकांची जबाबदारी आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी सैनिकांच्या कल्याणार्थ ध्वजदिन निधी उभारणीसाठी सढळ हाताने मदत करावी.*
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी-लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) : पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी संकलित करण्याचे दिलेले उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मदत करावी. नागरिकांनी केलेली मदत आपल्या देशाच्या पराक्रमी जवानांच्या कुटुंबियांना सदैव स्मरणात राहिल. नागरिकांनी जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे, स्टेट बँक ऑफ इंडिया, पुणे मेन शाखा, खाते क्रमांक ११०९९४६१२२८, आयएफएससी कोड – SBIN-००००४५४ या खात्यावर धनाकर्ष अथवा धनादेशाद्वारे मदत करून सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी.