पुणे : भारताच्या इतिहासात १८५७ च्या स्वातंत्र्य समराला विशेष महत्त्व आहे. या अखिल भारतीय संग्रामाचे नियोजन करण्यात सिंहाचा वाटा होता तो नानासाहेब पेशवे यांचा. त्यामुळे त्यांच्या व्दिशताब्दी जन्मसोहळ्या निमित्त पुणे ते वेणगाव अशी रथयात्रा काढण्यात आली. तसेच वेणगाव या त्यांच्या जन्मगावी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
इतिहास प्रेमी मंडळाने पुणे ते वेणगाव अशी नानासाहेब पेशवे रथयात्रा आयोजित केली होती. एसएसपीएमएस (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, लहुजी वस्ताद सेनेचे सुखदेव अडगळे, मंडळाचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक मोहन शेटे, शाहीर हेमंत मावळे, कुंदनकुमार साठे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. रायगड व शनिवारवाडा येथील जलकलश पूजन यावेळी करण्यात आले.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, इतिहास पुनरुजीवित झाला की भारताचे पुनरुजीवन होते. आपल्याला आजपर्यंत खोटा इतिहास शिकवला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांचा सखोल इतिहास शिकविला गेला नाही. त्यांच्या महान कार्याची जाणीव करून दिली गेली नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमांतून अभिमान जागृतीचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन शेटे म्हणाले, भारताच्या इतिहासात इंग्रजी साम्राज्या विरुद्ध भारतीयांनी १५० वर्ष केलेला स्वातंत्र्य संग्राम हे अभिमानास्पद पर्व आहे. त्यामध्ये १८५७ च्या स्वातंत्र्य समराला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात एकाचवेळी विविध समाज घटकांनी उठाव करणे ही अभूतपूर्व घटना होती. त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, रंगो बापुजी गुप्ते अशा अनेकांनी नेतृत्व केले. मात्र या अखिल भारतीय संग्रामाचे नियोजन करण्यात सिंहाचा वाटा होता तो नानासाहेब पेशवे यांचा. त्यांची दूरदृष्टी, संघटन कौशल्य,धाडस , अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी व प्रखर राष्ट्रभक्ती या गुणांमुळे हा संग्राम सर्वव्यापी होऊ शकला.