पुणे प्रार्थना समाज ही कर्तृत्वाचा, अनुभवाचा वारसा असणारी संस्था आहे. अनेकांना प्रार्थना समाज ही संस्था अस्तित्वात आहे, हे देखील माहित नाही. प्रार्थना समाज हा १९ व्या शतकातील जागृतीचा आविष्कार आहे. प्रार्थना समाजाची स्थापना करणारे युवक होते. त्यावेळी न्यायमूर्ती रानडे यांचे वय केवळ २५ होते. या पुढील काळात देखील तरुणांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे समजून त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. चळवळींमध्ये तरुणांचा वाटा असेल तर ती यशस्वी होते, असे मत इतिहास अभ्यासक प्रा.डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या १५४ व्या वार्षिकोत्सवानिमित्त युवक मेळा कार्यक्रमांतर्गत बुधवार पेठेतील पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ.सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग, खजिनदार श्री. प्रशांत पाडवे, तसेच धनराज निंबाळकर, अभिषेक पवार आदि सदस्य उपस्थित होते. ‘युवक मेळा’ कार्यक्रमांतर्गत ‘प्रार्थना समाजाची ओळख’ या विषयावर इतिहासकार प्रा.डॉ. राजा दीक्षित यांचे व्याख्यान तर संगणकतज्ञ योगेंद्र धर्माधिकारी यांचे ‘आपण सारे एक’ या विषयावर व्याख्यान झाले.
राजा दीक्षित म्हणाले, पुणे आणि वाई प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष या स्त्रिया आहेत, ही गोष्ट संस्थेतील स्त्री पुरुष समानता दाखवते. क्रांती घडविणारे बहुतेक सर्व समाज सुधारक आस्तिक होते. अध्यात्म या गोष्टीचा चुकीचा अर्थ अनेकदा घेतला जातो. बुवा-बाजीला अध्यात्म समजले जाते. पुणे प्रार्थना समाज, ब्राम्हो समाज हे सगळे समाज सुधारणेचा भाग आहेत.
सुषमा जोग म्हणाल्या, विज्ञानाशी सुसंगत असा प्रार्थना समाजाचा धर्मविचार आजच्या विज्ञान युगात महत्त्वाचा आहे. तसेच प्रार्थना समाजाची धर्मतत्त्वे स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये उमटलेली आहेत. त्यामुळे प्रार्थना समाज आजही काल प्रस्तुत आहे. तरुणांनी प्रार्थना समाजाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. त्यांच्या सहाय्यानेच पुढील काळात प्रार्थना समाजाची वाटचाल होणार आहे.
श्री. योगेंद्र धर्माधिकारी यांनी “आपण सारे एक ” ह्या विषयावर विचार मांडले. आपल्या भाषणात ते म्हणाले की वेदांतात सर्व चराचराचे एकत्व सांगितले आहे. आणि पेनरोझ ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने केलेल्या काही प्रयोगांमधून याला पुष्टी मिळते. व्याख्यानानंतर चर्चेत उपस्थित तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.


