पुणे, दिनांक ः इंटरनेटच्या युगात माहितीचा स्त्रोत म्हणून गुगल सारख्या सर्च इंजिनचा वापर केला जातो. मात्र, विश्वासार्ह आणि सत्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ग्रंथपालांची आहे, असे मत पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल यांनी केले.
भारतीय विचार साधना या संस्थेच्या वतीने आयोजित भारतीय व्यवहार कोश ग्रंथ प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, भाविसा फाउंडेशनचे संचालक बिपिन पाटसकर, भाविसाचे कार्यवाह काशिनाथ देवधर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रदीप बागल यांनी शालेय जीवनात पुस्तकांचे महत्व सांगितले. ते म्हणाले,”मुलांना हळूहळू वाचनाची लागलेली सवय त्यांना समृद्ध बनवते. त्यामुळे मुलांना आणि वाचकांना अधिक माहिती देण्याच्या दृष्टीने भाविसाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. शासकीय धोरणामुळे मुलांना अक्षर ओळख उशिराने होते. ही अक्षर ओळख व्हावी , मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी अनेक शाळांमधून ग्रंथपाल प्रयत्न करतात. छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विविध प्रकाराने माहिती आपल्या पर्यंत पोचत असते. या माहितीचे पृथःकरण करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी ग्रंथपलांची जबाबदारी असते.” कार्यक्रमाच्या सुरूवात प्रसाद भडसावळे यांनी भारतीय व्यवहार कोशाचे जनक विश्वनाथ नरवणे यांची ओळख करून दिली.
माधव राजगुरू म्हणाले, “आपल्याकडे कोश संपादनाची साधारणपणे दोनशे वर्षांची जुनी परंपरा आहे. इंग्रजांच्या भारतातील येण्यापासून या ग्रंथांची सुरुवात झाली. इथल्या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून इंग्रजांनी गॅझेटीअरची सुरुवात केली आणि भारतातील परंपरा संस्कृती, लोकजीवन, भाषा समजून घेण्यासाठी अशा कोशांची निर्मिती होऊ लागली. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी देखील १९२० ते १९२९ च्या काळात संस्कृती कोश तयार केला. भारतीय संस्कृती कोषाचे व्यासंगी संपादक आणि लेखक पंडित महादेवशास्त्री जोशी यांचे कोश निर्मितीमध्ये मोठे योगदान आहे.” शब्दकोशातून अनेक शब्द तर हाताळले जातात पण त्याबरोबर त्या भाषेतील प्रथा परंपरा यांची देखील माहिती होते. आणि म्हणून शब्दकोश हाताळला गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सन १८९४ मध्ये स्थापन झालेल्या १३० वर्षे जुन्या संस्थेचे म्हणजे महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे कार्यवाह श्री. चाफेकर उपस्थित होते. कार्यक्रमास विविध शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये येथील ८० ग्रंथपाल उपस्थित होते. बिपिन पाटसकर यांनी आभार प्रदर्शन केले.


