Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedअखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद अधिवेशन व साहित्य संमेलन पुण्यात परिषदेचे...

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद अधिवेशन व साहित्य संमेलन पुण्यात परिषदेचे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलन ; भव्य शोभायात्रेने होणार गुरुवारी (दि.१९) प्रारंभ

पुणे : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन दि.१९ ते २२ डिसेंबर दरम्यान स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले असून चार दिवसीय कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व साहित्य मंचचे श्याम भुर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष अजय कारेकर, उदयराव गडकरी,संजय चाचड, रवींद्र महिमकर, यजमान संस्थेच्या चिटणीस अरूणा गडकरी,रत्नाकर काकतीकर,कुमार अणवेकर आदी उपस्थित होते.

गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रेने सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, केसरी वाडा, रमणबाग शाळा, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे. यामध्ये वाचनसंस्कृती विषयी तसेच समाज प्रबोधनात्मक जनजागृती करण्यात येणार आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन देखील होईल. नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट,डॉ आनंद पेडणेकर आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित रतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता पहिल्या सत्रामध्ये समाजकार्यातील ज्ञातीचे योगदान या विषयावर चर्चा होणार आहे. तर, दुपारी ४.३० वाजता नोकरी की सुवर्णकारागिरी आणि सामाजिक कार्यात युवांची वानवा याविषयावर तज्ज्ञ आपले विचार व्यक्त करणार आहेत. तिसऱ्या सत्रात ज्ञाती पत्रके व समाजप्रबोधन यावर मार्गदर्शन करण्यात येईल.

शनिवार, दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता चौथ्या सत्रात कौटुंबिक जबाबदारी व महिलांचे सामाजिक योगदान, महिलांचा राजकारणातील सहभाग आणि वधूवर मेळाव्यातील आजची वास्तवता यावर विचारमंथन होणार आहे. तर शेवटच्या पाचव्या सत्रात महिलांनो सावधान, महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा व मान्यवर विचार मांडतील.

दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी ३ वाजता ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नाथमाधव साहित्य पुरस्कार वितरण व विविध पुस्तकांचे प्रकाशन होईल. सायंकाळी ६ वाजता कविसंमेलनाचे देखीलh आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी, दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मन शांतीसाठी संत साहित्य याविषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. यावेळी समाज श्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी यांची ग्रंथतुला होणार आहे. सकाळी ११ वाजता ग्रंथहंडी अंतर्गत या बाळांनो वाचू या आदि साहित्य चळवळीला चालना देणाऱ्या कार्यक्रमाबरोबर मान्यवर आपले विचार मांडतील. तसेच कार्यकर्ता गौरव सोहळा होणार आहे. दुपारी ३ वाजता खुले अधिवेशन व समारोप होणार असून यावेळी नियामक समितीकडून आलेले लेखी ठराव व त्यावर चर्चा होणार आहे. अधिवेशन व संमेलनाला प्रवेश खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

———————————————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments