पुणे १० जानेवारी, २०२५: फाऊंडेशन फॉर अॅडव्हान्सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (FAST India) आणि बजाज ऑटो लिमिटेड यांच्या सहकार्याने ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे सहाव्या भारत विज्ञान महोत्सवाचे आयोजन होणार आहे. फास्ट इंडिया ही संस्था विज्ञान, समाज आणि नवोन्मेष यामधील अंतर कमी करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे, जिज्ञासा निर्माण करणे आणि कृतीसाठी प्रेरणा देणे हे तिचे उद्दिष्ट आहे.
भारत विज्ञान महोत्सव हा भारतातील विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे स्वयंसेवी व्यासपीठ असून, यंदाच्या सहाव्या आवृत्तीची थीम “आयडियाज टू इम्पॅक्ट: सायन्स फॉर द पीपल” अशी आहे. यामध्ये विज्ञानाचे खरे स्वरूप उलगडले जाईल आणि ते समाजाच्या आव्हानांवर उपाय शोधून जीवन सुधारण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते, हे अधोरेखित केले जाईल. या महोत्सवाचा उद्देश विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानामधील नव्या शक्यता शोधणे, तसेच विज्ञानाची गोडी निर्माण करून त्याबद्दल व्यापक जनजागृती करणे हा आहे.
ISF २०२५ च्या आयोजनातून देशभरातील प्रमुख वैज्ञानिक, संशोधक, आणि समाजातील इतर क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणले जाणार आहे. गेल्या वर्षी IISER पुणे येथे आयोजित भारत विज्ञान महोत्सवाने दोन दिवसांत २३,००० हून अधिक लोकांचे लक्ष वेधले होते. यावर्षी अंदाजे ३०,००० लोक उपस्थित राहतील, तसेच ६० हून अधिक मान्यवर वक्ते आणि ३० हून अधिक प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. या महोत्सवात ग्रीन व्हेइकल्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सार्वजनिक आरोग्य, गणित, शाश्वतता आणि स्टेम सेल्स यांसारख्या विविध विषयांवर व्याख्याने आणि चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
भारत विज्ञान महोत्सवामध्ये बजाज ऑटो लिमिटेड, TIFR NCRA, CERN, Ather Energy, IISER पुणे, TIFR हैदराबाद, आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांसारख्या विविध प्रतिष्ठित संस्था आणि उद्योगांनी सहभाग नोंदवला आहे. महोत्सवात विज्ञान नाट्यप्रयोग, नृत्यसादरीकरण, वादविवाद, सायन्स क्विझ, आणि ५ लाख रुपयांपर्यंत बक्षिसांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय “बेस्ट ऑफ अनबाउंडेड सायन्स – इंडिया” (BoUnSc India) अंतर्गत तीन प्रमुख विज्ञान संवाद स्पर्धा देखील होतील.
फास्ट इंडिया चे सह-संस्थापक वरुण अग्रवाल यांनी या महोत्सवाबाबत सांगितले की, “सहाव्या भारत विज्ञान महोत्सवात विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण चर्चा आणि नवतारुण्याला प्रेरणा मिळेल. विज्ञान हे केवळ समाजातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठीच नव्हे, तर राष्ट्रीय प्रगतीसाठी कसे महत्त्वाचे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न या महोत्सवातून होणार आहे.”
भारत विज्ञान महोत्सव सर्वांसाठी मोफत असून सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
फास्ट इंडिया ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे सहाव्या भारत विज्ञान महोत्सवाचे आयोजन करणार
RELATED ARTICLES


