पुणे, दि. १४ जानेवारी : ” भगवान गौतम बुद्ध, महावीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.फुले, अण्णाभाऊ साठे, मुंडा, रविदास आणि विठ्ठल शिंदे यां सर्व महापुरूषांचे अर्क पचविणारे आचार्य रतनलाल सोनग्रा हे आहेत. त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास करून विपूल लेखन केले आहे. त्यांची लेखणी माणुस केंद्रीत आहे. ” असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे प्रसिद्ध साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचा ‘भारतीय साहित्य-संस्कृती अलंकार पुरस्कार’ ने मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी डॉ. सबनीस बोलत होते.
या प्रसंगी बिहार विद्यापीठाचे प्रा.रतनलला सिंह आरोही व ज्येष्ठ पत्रकार सुरेशचंद्र पाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व सौ. सोनाग्रा उपस्थित होत्या.
श्रीपाल सबनीस म्हणाले,” ज्ञानेश्वर आणि बुद्धावर लेखन करणारे आचार्य सोनग्रासारखे व्यक्ती भारतात दिसणार नाही. आज एमआयटीत ज्ञान आणि विज्ञान दिसून येतो. डॉ. विश्वनाथ कराड यांनी केलेले कार्य हे विश्वात्मक असल्याने ते विश्वरत्न आहेत. त्यांची प्रचिती ही साता समुद्रापलिकडे पोहचली आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” संत महात्मे ज्या मार्गानी जातात त्याच मार्गाने समाजाने जावे. समाज कल्याण हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. ज्ञानमयो विज्ञानमयो या संकल्पने नुसार प्रत्येक व्यक्तीने आचरण करावे. साहित्य क्षेत्राचा समाजावर सकारात्मक परिणाम होत असतो. संत साहित्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळते.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले,” व्यक्तीने आपले कर्तव्य करत रहावे. समाजाला जेव्हा वाटेल तेव्हा ते त्याची दखल घेतील. सतत जीवनाचा रस घ्यावा. साहित्य क्षेत्रात उतरल्यावर कळाले की रस्त्यावरील व्यक्ती कसे जगतात. साहित्य विश्वात असतांना काका साहेब गाडगीळ, आचार्य अत्रे आणि प्रा. विश्वनाथ कराड यांचा सहयोग लाभला हे माझे भाग्य आहे.”
प्रा.रतनलाल सिंह आरोही म्हणाले,” देशाची सामाजिक व्यवस्था विषमतेची असून वर्ण आधारित आहे. त्याला मिटविण्यासाठी भगवान गौतम बुद्धांपासून आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी देशात समतेचे आंदोलन चालले. हाच धागा पकडून आचार्य सोनग्रा यांनी संपूर्ण आयुष्य समतेवरच लिखाण केले आहे.”
सुरेशचंद्र पाध्ये म्हणाले,” आचार्य सोनाग्रा यांनी आयुष्यभर विचार मंथन करून हिंदी व मराठीत साहित्यकांची निर्मिती केली आहे. त्यांनी स्वतःच्या कक्षा रूंदावल्यात त्यामुळे समाज व्यवस्थेला त्यांचा फायदा झाला.”
यावेळी डॉ. महेश थोरवे यांनी मानपत्राचे वाचन केले.
प्रा. प्रदीप माळी यांनी सूत्रसंचालन व डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.
महापुरूषांचे अर्क पचविणारे साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा डॉ. श्रीपाल सबनीस यांचे विचारः माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे ‘भारतीय साहित्य-सस्कृती अलंकार पुरस्कारा’ ने आचार्य सोनग्रा यांचा सन्मान
RELATED ARTICLES


