पुणे : अभिताभ होनप लिखित ‘मी गीता बोलतीय’ या भगवदगीतेचे उत्कंठावर्धक वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयस मधील अंबर हॉल येथे सायंकाळी ६ वाजता पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
यावेळी समारंभाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रमुख पाहुणे भारतीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहंदळे, लेखक धनंजय गोखले, जनसेवा फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. विनोद शहा उपस्थित राहणार आहेत.
‘मी गीता बोलतीय’ हा ग्रंथ भगवद्गीतेचे उत्कंठावर्धक वर्णन आहे. भगवद्गीतेचा सगळा प्रसंग ती, प्रभू कृष्ण आणि अर्जुनासोबत युद्धभूमीवर उपस्थित असल्याप्रमाणे कथन करते, आणि धृतराष्ट्राला जसा संजय सांगून गेला, तशी येथे थेट गीता आपल्याला सारे प्रसंग आणि ज्ञानबिंदू सांगून जाते.
‘मी गीता बोलतीय’ हा एक अनोखा अविष्कार आहे जिथे स्वतः गीता केवळ गीतेची शिकवण आणि उपदेश ह्यावर उजेड टाकत नाही, तर अर्जुनालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला आश्वस्त करण्यासाठी श्रीकृष्णाने संपूर्ण रचना आणि क्रम का व कसा आखला याचे विश्लेषण करण्यासाठी गीता त्याच्या मनात डोकावते, आणि ती विचारसंस्था आपल्या पुढे उलगडून दाखवते.


