Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedचाचा नेहरु बाल महोत्सव उत्साहात साजरा

चाचा नेहरु बाल महोत्सव उत्साहात साजरा

पुणे, दि. २१ : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क संस्था, मळवली, भाजे, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे १६ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान चाचा नेहरु बाल महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या महोत्सवात पुणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या बालगृहांमधील १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो-खो, लांब उडी, धावणे, चित्रकला, निबंध लेखन, बुद्धिबळ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन सोहळ्याला महिला व बालविकास विभागाचे सह आयुक्त राहुल मोरे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या श्रीमती जयश्री पालवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती मनिषा बिरारीस, बाल कल्याण समिती पुणे १ व २ चे अध्यक्ष व सदस्य अमितकुमार बॅनर्जी (संस्थापक/सचिव, संपर्क संस्था) तसेच भाजे व मळवली गावांचे सरपंच उपस्थित होते.

कार्यक्रमातील मान्यवरांनी मुलांचे विशेष कौतुक केले. त्यांनी मुलांच्या प्रतिभेचे, आत्मविश्वासाचे आणि उपक्रमशीलतेचे तोंडभरुन स्तुती केली. आपल्या भाषणातून त्यांनी मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. “मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे; योग्य संधी दिल्यास ते देशाचा उज्ज्वल भविष्य घडवू शकतात,” असे मत राहुल मोरे यांनी व्यक्त केले. श्रीमती जयश्री पालवे यांनी मुलांच्या स्वप्नांना पंख देण्याच्या दृष्टिकोनातून पालक व संस्थांना मार्गदर्शन केले.

समारोप सोहळ्यात महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त संजय माने आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदर यांची उपस्थिती होती. यावेळी अमितकुमार बॅनर्जी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच संस्थेतून बाहेर पडलेल्या आणि विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व संपर्क संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments