मुंबई, 4 फेब्रुवारी 2025: ड्रीम स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धेत रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स(आरएफवायसी) संघाने मुंबई स्कुल स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स संघाचा सामना ब्रदर्स स्पोर्ट्स असोसिएशन संघाशी होणार आहे.
कुपरेज फुटबॉल स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत आरएफवायसीच्या शॉन फर्नांडिसने 4थ्या मिनिटाला चेंडूवर ताबा मिळवत गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर 11व्या मिनिटाला शॉन फर्नांडिसने आणखी एक गोल करून संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. पूर्वार्धात हि आघाडी कायम होती. उत्तरार्धात देखील आरएफवायसीच्या खेळाडूंनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली.75 व्या मिनिटाला प्रीतम ब्रह्माने गोल करून संघाला ३-० अशी आघाडी वाढवून दिली. सामना संपण्यास दोनच मिनिटे शिल्लक असताना फारीस अ. याने गोल करून आरएफवायसी संघाला मुंबई स्कुल स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध 4-0 अशा फरकाने विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात ब्रदर्स स्पोर्ट्स असोसिएशन संघाने मुंबई सिटी एफसी संघाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. मुंबई सिटी एफसीच्या निव चिप्पाने 3ऱ्या मिनिटालाच गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. पण 12व्या मिनिटाला ब्रदर्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या गविष्ठ गोयलने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. 29व्या मिनिटाला कर्णधार तैनम मारशिलॉंग याने गोल करून पूर्वार्धात संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात अतिरिक्त वेळेत 94व्या मिनिटाला ब्रदर्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या निबाश सिंगने गोल करून संघाला 3-1 अशा फरकाने विजय मिळवून दिला.


