राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनीपी ) अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध केला आहे. या आराखड्यावरील व्यापक चर्चेसाठी पुण्यात राज्यस्तरीय पुणे शिक्षण परिषदेचे आयोजन शनिवार,दि. 22 फेब्रुवारी 25 रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे व शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेत राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व अंमलबजावणी बाबत कृती कार्यक्रम ठरविण्यात येईल, अशी माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. आनंद काटिकर आणि राज्य सुकाणू समितीचे सदस्य डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुणे शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विद्याभारतीचे डॉ. अरूण कुलकर्णी म्हणाले, या परिषदेत शिक्षक, संस्थाचालक, अंगणवाडी सेविका, शिक्षण तज्ञ, स्तंभलेखक सहभागी असणार आहेत. सकाळी 9.30 वा. माननीय मंत्रि महोदयांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होऊन या परिषदेला प्रारंभ होईल तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या “शिक्षणाचे भारतीयकरण” या विषयावरील मार्गदर्शनाने परिषदेचा समारोप होईल. दिवसभर चालणाऱ्या या परिषदेमध्ये
पायाभूत शिक्षण याविषयी डॉ. मधुश्री सावजी, शालेय शिक्षण आराखडा याविषयी डॉ. मिलिंद नाईक यांचे बीज भाषण होईल. त्यानंतर विविध समांतर सत्तांमध्ये पंचकोष विकास, भारतीय ज्ञान परंपरा, कौशल्य विकास, शालेय संकुल व संस्कृती इत्यादी विषयांवर विविध तज्ञ मार्गदर्शन व चर्चा आयोजित करणार आहेत. डॉ. महेश्वर कळलावे, डॉ. अजय महाजन, श्री रमेश देशपांडे ,श्री संतोष भणगे, शोभना भिडे इत्यादी चर्चा प्रवर्तक याविषयी चर्चासत्र संचलित करतील. या परिषदेच्या निमित्ताने घोषित झालेल्या आराखड्यांवरच्या संकल्पना स्पष्ट करणे त्याच्या अंमलबजावणीचा कृती कार्यक्रम समजावून सांगणे व त्यासाठी सरकार, संस्था इत्यादी स्तरावर करावयाच्या बदलांचा ठराव संमत केला जाणार आहे.
या परिषदेच्या तयारीसाठी शिक्षा समूहाचे प्रमुख श्री विवेक देशपांडे, विद्याभारतीच प्रांताचे संयोजक रघुनाथ देवीकर,प्रचार विभागाचे राजन वडके व मिलिंद कांबळे यांच्यासह डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक कर्मचारी सतत परिश्रम घेत आहेत. या परिषदेमध्ये आगाऊ नोंदणी करून सहभागी होता येईल अशी माहिती श्री रघुनाथ देवीकर व मिलिंद कांबळे यांनी दिली.


