Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedMIT-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे या संस्थेने आरोग्यसेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि औषध...

MIT-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे या संस्थेने आरोग्यसेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि औषध वेळेवर घेण्यास मदत करणारे IoT-सक्षम ‘पिल डिस्पेन्सर’ केले विकसित

पुणे,10मार्च 2025 :- MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे यांनी IoT-सक्षम टॅब्लेट आणि कॅप्सूल डिस्पेन्सर विकसित केले आहे. हे विविध कप्पे असलेले उपकरण स्वयंचलित आणि दूरस्थ पद्धतीने (मोबाइल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून) औषध व्यवस्थापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. औषध घेण्याचे गुंतागुंतीचे वेळापत्रक असलेल्या व्यक्तींना वेळेवर आणि अचूक औषध घेण्यास मदत करण्यासाठी या अभिनव उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे.

आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या औषध डिस्पेन्सरला अनेक मर्यादा होत्या. या डिस्पेन्सरमधून व्यक्तीला स्वतःला औषधे घ्यावी लागतात आणि त्याच्या वापरावर मोबाइल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून लक्ष ठेवता येत नाही. या अडचणी दूर करण्यासाठी MIT-WPUने नवीन तंत्रज्ञान वापरून एक आधुनिक औषध डिस्पेन्सर तयार केले आहे. या उपकरणात समभुज आकाराचा कंटेनर आहे, ज्यात औषधे ठेवण्यात येतात. औषध ठेवलेला खण ठरलेल्या वेळी बाहेर येण्यासाठी एक मोटरचलित प्रणाली आणि युझरने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार औषध देण्यासाठी एक कंट्रोलर युनिट आहे. याशिवाय, औषध वेळेत घेतले जाते की नाही, यावर मोबाइल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याची सुविधाही यात आहे.

MIT-WPUमधील स्कूल ऑफ फार्मसीचे प्राध्यापक डॉ. अमोल तागलपल्लेवार म्हणाले, “सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात वेळेवर आणि नियमितपणे औषधे घेणे कठीण झाले आहे. विशेषतः ज्यांना अनेक प्रकारची औषधे ठरावीक वेळी घ्यायची असतात, त्यांच्यासाठी ही समस्या काकणभर जास्तच असते. अभिनव IoTवर (इंटरनेट ऑफ थिंग्स) आधारित पिल-डिस्पेन्सरच्या माध्यमातून या समस्येवरील प्रभावी उपाययोजना सादर करण्यात आली आहे. यात पिल-डिस्पेन्सिंग म्हणजे औषधाच्या गोळ्यांचा खण बाहेर येण्याची प्रक्रिया स्वयंचलितपणे होते. त्याचप्रमाणे मोबाइल वा इंटरनेटच्या माध्यमातून यावर लक्षही ठेवता येते व नियंत्रण करता येते. त्यामुळे रुग्ण तसेच रुग्णांचे काळजीवाहक यांच्यासाठी ही एक मोठी सोय झाली आहे. हे उपकरण केवळ औषध देण्यासाठी नाही, तर लोकांना वेळेवर औषध घेण्याचे महत्त्व समजावून आरोग्याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगमधील साहाय्यक प्राध्यापक डॉ. सी. एच. पाटील म्हणाले, “हे डिव्हाइस आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. कारण या उपकरणात तंत्रज्ञान आणि सोयीस्कर डिझाइन यांची सांगड घालून सहज वापरता येणारी, प्रभावी आणि परिणामकारक सुविधा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे, तंत्रज्ञान हे फक्त एक साधन न राहता, आरोग्य सुधारण्यासाठी मदत करणारा साथीदार ठरेल आणि लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग होईल.”

या डिस्पेन्सरमध्ये औषध देण्यासाठी विशेष रचनेचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये मोटरद्वारे नियंत्रित यंत्रणा असून, डिस्पेन्सिंग युनिट्स गोलाकार पद्धतीने जोडलेली असतात. वापरकर्त्याने निश्चित केलेल्या वेळेनुसार नियंत्रकातर्फे युनिटला निर्देश पाठवविण्यात येतो आणि औषध स्वयंचलितपणे दिले जाते. इंटरनेट ऑफ थिंग्सच्या सहाय्याने, औषध वेळेवर घेतले जाते की नाही, यावर आरोग्यसेवा कर्मचारी आणि काळजीवाहक व्यक्तींना लक्ष ठेवता येते. त्यामुळे औषध वेळेवर व योग्य प्रमाणात दिली जातात आणि आरोग्यसेवेत सुधारणा होते. हे उपकरण घरी, वृद्धाश्रमांमध्ये आणि रुग्णालयात औषध व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

==============================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments