पुणे १७ मार्च २०२५ : रस्ते अपघातानंतर नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मेंदूमृत घोषित झालेल्या ४९ वर्षीय पुरूषाने हृदय, मूत्रपिंड आणि नेत्र दान करून पाच रुग्णांना नवजीवन दिले. हृदय मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले, एक मूत्रपिंड बाणेर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले तर दुसरे मूत्रपिंड नोबल हॉस्पिटलमध्ये दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले.
४९ वर्षीय पुरूष अभियंता, पादचाऱ्याला १३ मार्च रोजी रात्री रस्ता ओलांडताना अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आणण्यात आले. नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कार्यकारी संचालक एच.के साळे म्हणाले की, रुग्णाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि १४ मार्चच्या रात्री त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाने अवयवदान करण्यास संमती दिली, त्यानंतर १५ मार्च रोजी संध्याकाळी त्यांचे हृदय, मूत्रपिंड आणि नेत्र काढण्यात आले आणि ग्रीन कॉरिडॉरद्वारे विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण नोबल हॉस्पिटल येथे मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असलेल्या 62 वर्षीय महिलेवर करण्यात आले.
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या टीममध्ये डॉ. विक्रम सातव, डॉ.संगीता चंद्रशेखर, वैद्यकीय प्रशासक डॉ. राज कोद्रे , वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अभिजित देशमुख, प्रवीण जाधव , प्रत्यारोपण समन्वयक विशाल तोरडे इत्यादींचा समावेश होता.
मूत्रपिंड प्रत्यारोपणात नोबल हॉस्पिटलच्या टीम मध्ये डॉ. विक्रम सातव, डॉ. शशिकांत आसबे, भूल तज्ज्ञ डॉ. संगीता चंद्रशेखर, डॉ. नीलेश वसमत्कर आणि नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अविनाश इग्नाटीअस आणि राकेश शिंदे यांचा समावेश होता.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, अवयवदानासाठी संमती देणाऱ्या मृतांच्या कुटुंबातील सदस्यांना आम्ही सलाम करतो. त्यांच्या निःस्वार्थ कृतीमुळे प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्णांना नवजीवन मिळाले.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने म्हणाले की, विविध रुग्णालयांमध्ये अवयव पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केल्याबद्दल आम्ही वाहतूक पोलिसांचे व हडपसर पोलिस स्टेशनच्या टीमचे आभार व्यक्त करतो. तसेच या सर्व प्रक्रियेचे समन्वयन केल्याबद्दल झेडटीसीसी पुणे यांचे आभार
मानतो.


