Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedशहरातील घनकचरा पुनर्वापर साठवणूकीच्या पिंजऱ्याचे मॉडेल डिझाईन * बीएनसीएतील 20 विद्यार्थिनींच्या...

शहरातील घनकचरा पुनर्वापर साठवणूकीच्या पिंजऱ्याचे मॉडेल डिझाईन * बीएनसीएतील 20 विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेतून साकारला हा प्रकल्प

पुणे, दि. १८ मार्च २०२५ : शहरातील घनकचरा व्यवस्थापनातील पुनर्वापरासाठी साठवल्या जाण्यासाठी लागणाऱ्या कचऱ्याच्या पिंजऱ्याचे सुटसुटित व सहज हाताळता येईल असे मॉडेल डिझाईन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) 20 विद्यार्थिनींनी तयार केले. पथदर्शी प्रकल्प म्हणून कचऱ्याच्या या आकर्षक पिंजऱ्याचे मॉडेल पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड प्रभागाने आनंदनगर भागातील कॅनॉल रोड येथे बसवले आहे. ‌‘स्वच्छ पुणे ’ या संकल्पनेनुसार त्याचा वापर स्थानिक नागरिक व कचरा वेचक करत आहेत.

 

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनातील कागद, काच व प्लॅस्टीक वेगळे करून पिंजऱ्यात वर्गवारीनुसार ठेवण्यासाठी बनवलेल्या पिंजऱ्याच्या या डिझाईन मॉडेलचे कौतुक बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी केले. यासाठी काम करणाऱ्या 20 विद्यार्थिनींच्या सक्रीय व सर्जनशील सहभागाबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. महेश बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली तृप्ती थापा व मोहिनी मांडके या विद्यर्थिनींसह 20 जणींनी हा पिंजरा कचरा वेचकांच्या सर्व गरजा लाक्षात घेऊन तयार केला. ‌‘स्वच्छ‌’ या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गंधार जोशी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

 

जोशी म्हणाले की, यापूर्वी शहरातील घनकचरा पुनर्वापरासाठी वापरले जाणारे पिंजरे लोखंडाचे असून ते लवकर गंजत. तसेच त्यामध्ये उंदीर, घुशी व कीटकांचा प्रादूर्भाव होत असे. शिवाय कचराकुंडी समजून स्थानिक नागरिक त्याच्याजवळ कचरा टाकत. पिंजऱ्याच्या नव्या डिझाईनमुळे आता या कचऱ्याचे अधिक व्यवस्थित व कार्यक्षम पद्धतीने वर्गीकरण करणे शक्य झाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर बीएनसीएने तयार केलेल्या या पिंजऱ्यासारखे आणखी पिंजरे शहर व उपनगरांमध्ये बसवण्यात येतील.

 

प्रा. बांगड म्हणाले की, या पिंजऱ्याभोवती स्वच्छता व कचऱ्याचा पुनर्वापराचे पर्यावरणपूरक संदेशही कलात्मक पद्धतीने लावण्यात आले आहेत. स्वच्छ पुणे या संकल्पनेसाठी आम्ही हा प्रकल्प सामाजिक व स्वच्छ पर्यावरणाच्या बांधिलकीतून केला आहे.

 

विद्यार्थिनी मोहिनी मांडके म्हणाली की, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आम्ही एकत्र येऊन ‌‘स्वच्छ‌’ संस्थेशी चर्चा करताना कचरा वेचकांच गरजा व अपेक्षा लक्षात घेतल्या. त्यानुसार पूर्वी वापरात असणाऱ्या लोखंडी पत्र्याऐवजी आम्ही सिमेंटचे पत्रे वापरून हा 10 फूट लांब 5 फूट रूंद आणि 9 फूट उंचीचा पिंजरा तयार केला. तो सुटा करून कुठेही नेता येतो. एरव्ही कचऱ्याचे असे पिंजरे आपल्या वसाहतींपाशी नको अशी नागरिकांची धारणा या नवीन कलात्मक पिंजऱ्यांनी बदलून टाकली आहे. हा पिंजरा छोट्या टुमदार कार्यालयासारखे दिसतो.

 

बीएनसीएने तयार केलेल्या या पिंजऱ्याचे प्रारूप यापूर्वी नॅशनल असोसिएनश ऑफ स्टूडंट्स ऑफ आर्किटेक्चरतर्फे (नासा) आयोजित केलेल्या 67व्या वार्षिक नासा डिझाईन स्पर्धेसाठी पाठवण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत देशभरातील दीडशेहून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments